पुढील महिन्यात भोपाळमध्ये संयुक्त सभा
नवी दिल्ली : सनातन धर्माचा वाद तीव्र झाला असताना राष्ट्रीय स्तरावर भाजपेतर ‘इंडिया’ महाआघाडीने पुन्हा ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न बुधवारी झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीतून केला. राज्यस्तरावर जागावाटपाच्या प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ‘इंडिया’च्या घटक पक्षांच्या नेत्यांची पहिली संयुक्त सभा पुढील महिन्यात भोपाळमध्ये होईल. या सभेतून विरोधकांकडून आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजवले जाईल.
केरळ व पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये जागावाटपाचा तिढा सुटला नसला तरी, अन्य राज्यांमध्ये जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यावर समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सहमती झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संबंधित घटक पक्षांनी जिंकलेल्या जागा, राज्यातील सद्यस्थिती यांचा विचार करून जागावाटपाचा प्रश्न सोडवला जाईल. या चर्चामध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला जागावाटपामध्ये झुकते माप दिले जाईल. राज्या-राज्यांमध्ये समन्वय समिती स्थापन केली जाणार असून त्यामध्ये जागावाटपावर प्राथमिक चर्चा होईल व त्यानंतर केंद्रीय समन्वय समितीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ‘राज्यस्तरावर जागावाटपाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जाईल’, असे समितीचे सदस्य व काँग्रेसचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्येही स्थानिक नेत्यांकडून जागावाटपावर आक्षेप घेतला जात आहे. हरियाणामध्ये ‘आप’कडून लोकसभेच्या दहाही जागा लढवल्या जाणार असल्याच्या चर्चेनंतर हरियाणा काँग्रेसच्या नेत्यांनीही सर्व जागा लढवण्याचा दावा केला. मात्र, राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस व आम आदमी पक्षामध्ये तडजोड होण्याची शक्यता आहे. ‘आम्ही कुटुंबातील सदस्याप्रमाणे एकमेकांशी चर्चा करून जागावाटपाचा प्रश्न सोडवू’, असे ‘आप’चे नेते राघव चड्ढा यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले. महाराष्ट्रामध्ये मंगळवारी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्दय़ावर प्राथमिक चर्चा झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’च्या नेत्यांची पहिली संयुक्त सभा भोपाळमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात होणार आहे. या सभेत विविध मुद्दय़ांवर भर दिला जाणार असल्याची माहिती वेणुगोपाल यांनी दिली.
जातगणना प्रचाराचा मुद्दा?
महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक तीव्र होत असून मराठा- ओबीसी या नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’च्या घटक पक्षांनी राष्ट्रीय स्तरावर जातनिहाय जनगणनेची मागणी अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. समन्वय समितीच्या बैठकीत जातगणनेच्या मुद्दय़ावर सहमती झाली असून आगामी लोकसभा निवडणुकीतच नव्हे तर, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही हा प्रचाराचा मुद्दा बनवला जाण्याचे संकेत ‘इंडिया’ने दिले.
सनातन वादावरही चर्चा
सनातन धर्माविरोधात ‘द्रमुक’च्या नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे ‘इंडिया’तील घटक पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या मुद्दय़ावरही समन्वय समितीच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे समजते. ‘द्रमुक’ने ‘सनातन’वर भूमिका स्पष्ट केली असून शिवसेना (ठाकरे गट) व अन्य पक्षांचे म्हणणेही विचारात घेण्यात आले. ‘सनातन’च्या वादावर घटक पक्षनेत्यांनी वेगवेगळी विधाने न करता ‘इंडिया’च्या प्रवक्त्यांकडून संयुक्तिक भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे समजते.
काही वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार
काही वृत्तवाहिन्यांच्या कथित ‘इंडिया’विरोधी निवेदकांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती वेणुगोपाल यांनी दिली. मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’च्या नेत्यांची पहिली संयुक्त सभा भोपाळमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात होणार आहे. या सभेत महागाई, बेरोजगारी, भाजप सरकारचा भ्रष्टाचार आदी मुद्दय़ांवर भर दिला जाणार असल्याची माहिती वेणुगोपाल यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी व माकपचा प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही. बॅनर्जी यांची कोलकातामध्ये बुधवारी दिवसभर ‘ईडी’कडून चौकशी केली जात होती.
दिल्ली, पंजाबच्या नेत्यांचा आक्षेप
दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्येही स्थानिक नेत्यांकडून जागावाटपावर आक्षेप घेतला जात आहे. हरियाणामध्ये ‘आप’कडून लोकसभेच्या दहाही जागा लढवल्या जाणार असल्याच्या चर्चेनंतर हरियाणा काँग्रेसच्या नेत्यांनीही सर्व जागा लढवण्याचा दावा केला. मात्र, राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस व आम आदमी पक्षामध्ये तडजोड होण्याची शक्यता आहे. ‘आम्ही कुटुंबातील सदस्याप्रमाणे एकमेकांशी चर्चा करून जागावाटपाचा प्रश्न सोडवू’, असे ‘आप’चे नेते राघव चड्ढा यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले.