प्रत्येक दहशतवादी घटनेनंतर कोणताही पुरावा न देता पाकिस्तानवर खापर फोडण्याची भारताला सवय आहे असा आरोप पाकिस्तानमधील परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी केला आहे. जागतिक स्तरावर पाकिस्तान एकटा पडलेला नसून भारतासोबत चर्चा स्थगित झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्रधोरण विषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी एक्सप्रेस न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतावर टीकास्त्र सोडले आहे. भारतासोबत बंद दाराआड किंवा अन्य मार्गाने चर्चा करण्याची आमची भूमिका नाही. कोणतीची चर्चा ही दोन्ही देशांच्या सहमतीने होतात याकडे अझीझ यांनी लक्ष वेधले आहे. प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवरच खापर फोडते असा आरोप त्यांनी केला. काश्मीरमध्ये होणारे मानवी हक्कांचे उल्लंघन हाच नवाझ शरीफ यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणाचा प्रमुख मुद्दा होता असे त्यांनी नमूद केले.
पाकिस्तानला जागतिक स्तरावर एकाकी पाडण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासोबतच जागतिक स्तरावरही त्यांच्यावर निर्बंध लादण्यासाठी भारताचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. यावरही सरताज अझीझ यांनी भाष्य केले आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडलेला नाही. पाकिस्तानची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे असा दावाही त्यांनी केला आहे.
पाकिस्तानचे चीनशी वाढती मैत्री ही पाश्चिमात्य देशांसाठी चिंतेची बाब आहे असे अझीझ यांचे म्हणणे आहे. पण पाकिस्तानचे अमेरिका, युरोपीय महासंघासोबत चांगले द्विपक्षीय संबंध आहेत असा दावाच त्यांनी केला. उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले आहेत. उरी हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. यामुळे तणावात आणखी भर पडली. काश्मीरमधील हिंसाचाराचा प्रश्न जागतिक स्तरावर मांडण्यासाठी पाकिस्तानने २१ खासदारांची विशेष दूत म्हणून नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे उरी हल्ल्याप्रकरणी भारताने पाकिस्तानला पुरावा देऊनही अझीझ यांनी भारत पुरावा देत नाही असा कांगावा केला आहे.