भारत व चीन हे एकमेकांचे महत्त्वाचे शेजारी देश असून सीमेवर शांतता राखणे हेच दोन्ही देशांच्या हिताचे असून त्यासाठी संयुक्त प्रयत्नांची गरज आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालय व संरक्षण मंत्रालय यांनी स्वतंत्र निवेदन जारी केले असून पूर्व लडाखमधील १५ जूनच्या हिंसाचारास भारतच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वू क्वियान यांनी सांगितले की, दोन्ही देशांचे संरक्षण मंत्री दूरध्वनीवर वाटाघाटी करीत आहेत. दोन्ही देशात लष्करी पातळीवरची दुसरी बैठक २२ जून रोजी झाली. त्यात सीमेवर शांतता राखण्यावर मतैक्य झाले.
चीन व भारत सीमेवर शांतता राखणे दोन्ही देशांच्या हिताचे असून त्याकरिता संयुक्त प्रयत्नांची गरज आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये जे मतैक्य यापूर्वी झाले आहे. त्या दिशेने काम करताना करारांचे कठोरपणे पालन करण्याची गरज आहे. संबंधित प्रश्न संवाद व वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्याची गरज आहे. सीमेवर शांतता व स्थिरता राखण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले की, दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांचे १७ जूनला फोनवर बोलणे झाले आहे व सध्याच्या पेच प्रसंगावर न्याय्य तोडगा काढण्याचे त्यांनी मान्य केले आहे. मतैक्यासाठी कमांडर पातळीवर बैठका घेण्यात आल्या असून परिस्थिती लवकरच शांत होईल. दोन्ही देश सीमेवर शांतता प्रस्थापित करतील. २२ व २३ जून रोजी कमांडर पातळीवरील चर्चा झाली.
भारताच्या चिथावणीमुळेच सीमेवर चकमक झाली असून त्याची जबाबदारी चीनवर येत नाही. भारतीय बाजूने जोखमीचे वर्तन करण्यात आले त्यात दोन्ही देशातील करार व आंतरराष्ट्रीय संबंधविषयक निकषांचे उल्लंघन झाले आहे. भारतीय माध्यमे व भारताचे परराष्ट्र मंत्रालय यांनी आमच्यावर चुकीचे आरोप केले असल्याने हे स्पष्टीकरण करणे भाग पडत आहे.
समझोत्याची अंमलबजावणी: भारत-चीन तयार
पूर्व लडाखमध्ये सीमेवर पूर्वीसारखी स्थिती निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांनी सैन्य माघारीबाबत केलेल्या समझोत्याची अंमलबजावणी करण्यास भारत व चीन यांनी बुधवारी मान्यता दिली असल्याचे भारताच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे. सैन्य माघारीनंतर सीमेवर शांतता निर्माण होण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले.
जवानांच्या कामगिरीचे कौतुक
चीनच्या सैन्याने गलवान खोऱ्यात केलेल्या हिंसाचारात २० भारतीय जवान हुतात्मा झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या लेह दौऱ्यात घेतला. त्यांनी पूर्व लडाखमध्ये सीमावर्ती भागातील चौक्यांना भेट देऊन लष्कराच्या सज्जतेची माहिती घेतली तसेच सीमेवरील जवानांच्या कामाचे कौतुक केले.
भारताने दावा फेटाळला
चीनने दोन्ही देशांत लष्करी पातळीवरील चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही सीमेवर मोर्चेबांधणी सुरू ठेवली असून दोन्ही देशांतील वाद लगेच संपण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. भारताने गलवान खोऱ्यावर चीनने केलेला सार्वभौमत्वाचा दावा फेटाळला असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील जैसे थे परिस्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न स्वीकारला जाणार नाही, असे म्हटले आहे.