India Issued Statement on Trump Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी भारत व पाकिस्तान यांच्यातील संघर्षात आपणच मध्यस्थी केल्याचे दावे वारंवार करून भारत सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आता ट्रम्प सातत्याने भारताला अतिरिक्त टॅरिफ लागू करण्याची धमकी देत आहेत. काही दिवसांपूर्वीच भारतावर २५ टक्के टॅरिफ आणि अतिरिक्त दंड आकारला जाईल, असं ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं. सोमवारी संध्याकाळी केलेल्या सोशल पोस्टमध्ये रशियाकडून भारत तेल खरेदी करतो म्हणून आणखी टॅरिफ आकारले जाईल, अशी नवी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. यावर आता भारत सरकारने रशियाचंच उदाहरण देत ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
काय आहे डोनाल्ड ट्रम्प यांची नवी धमकी?
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी संध्याकाळी ट्रुथ या सोशल मीडिया साईटवर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये भारतावर अतिरिक्त टॅरिफ आकारणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र, त्याचबरोबर रशियाकडून भारत तेल आयात करत असल्याचं कारणही त्यांनी पुढे केलं आहे.
“भारत रशियाकडून फक्त तेल आयातच करत नाही, तर त्या तेलाचा मोठा भाग खुल्या बाजारात विकून मोठा नफादेखील कमावत आहे. रशियाच्या युद्धनीतीमुळे युक्रेनमध्ये किती लोक मारले जात आहेत याची भारताला अजिबात फिकीर नाही. त्यामुळे मी भारताकडून अमेरिकेला दिल्या जाणाऱ्या टॅरिफमध्ये वाढ करत आहे”, असं ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

भारतानं दिलं प्रत्युत्तर, ट्रम्प यांना दाखवला आरसा!
दरम्यान, ज्या रशियाचं नाव घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकावलं आहे, त्याच रशियाकडून अमेरिका व युरोपियन युनियन कच्चा माल आयात करत असल्याचा दाखला भारतानं दिला आहे. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाकडून सोमवारी संध्याकाळी उशीरा निवेदन जारी करण्यात आलं आहे. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून हे निवेदन शेअर केलं आहे.
“युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका व युरोपियन राष्ट्रे रशियाकडून तेल आयात करतो म्हणून भारतावर सातत्याने टीका करत आहेत. पण युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून तेलाचे उपलब्ध पुरवठा पर्याय हे युरोपकडे वळवण्यात आले. त्यामुळेच भारतानं रशियाकडून तेल आयात करायला सुरुवात केली. त्यावेळी जागतिक स्तरावरील ऊर्जा बाजारपेठेतील समतोल टिकवण्यासाठी अशा प्रकारची आयात करण्यास अमेरिकेने भारताला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं होतं”, असं या निवेदनात भारतानं स्पष्ट केलं आहे.
“टीका करणाऱ्या देशांचाच रशियाशी व्यापार”
दरम्यान, भारतावर टीका करणारे देशच रशियाशी व्यापार करत असल्याचं भारतानं निवेदनात म्हटलं आहे. “भारतीय ग्राहकांना परवडणाऱ्या दरात इंधन उपलब्ध होण्यासाठी भारत रशियाकडून तेल आयात करतो. जागतिक बाजारपेठेच्या परिस्थितीमुळे भारताला हे करणं भाग पडलं. पण जे देश भारतावर टीका करतात, तेच देश रशियाशी व्यापार करत असल्याचं उघड झालं आहे. आमच्याप्रमाणे हा व्यापार करणं या देशांना आवश्यक नसूनही हा व्यापार चालू आहे”, असा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे.
“२०२४मध्ये युरोपियन युनियनने रशियाशी ६७.५ बिलियन युरोचा द्वीपक्षीय व्यापार करार केला. २०२३ मध्येदेखील युरोपियन युनियनचा रशियाशी १७.२ बिलियन युरोचा सेवा क्षेत्रातील करार होता. भारताने त्या वर्षी किंवा त्यानंतरही रशियाशी केलेल्या व्यापार करारापेक्षा हे प्रमाण निश्चितच जास्त आहे. युरोपिनय देशांमध्ये रशियातून आयात होणारा LNG २०२४ मध्ये तब्बल १६.५ मिलियन टन इतका होता. त्याआधी सर्वाधिक १५.२१ मिलियन टन LNG २०२२ मध्ये रशियातून युरोपियन देशांनी आयात केला होता”, अशी आकडेवारी या निवेदनात देण्यात आली आहे.

अमेरिकेचा रशियाशी युरेनियमचा व्यापार
दरम्यान, अमेरिकेचा रशियाशी युरेनियमचा व्यापार होत असल्याची बाब या निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे. “अमेरिकेबाबत बोलायचं झाल्यास त्यांच्या आण्विक क्षेत्रासाठी, इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रासाठी, फर्टिलायझर आणि रासायनिक उत्पादनांसाठी ते रशियाकडून बऱ्याच काळापासून युरेनियम हेक्साफ्लुओराईड खरेदी करत आहेत”, असं या निवेदनात भारतानं नमूद केलं आहे.
भारताचा अमेरिकेला इशारा
“या पार्श्वभूमीवर भारताला सातत्याने लक्ष्य करत राहाणं हे अन्याय करणारं आणि अतार्किक आहे. दुसऱ्या कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेप्रमाणेच भारतदेखील या परिस्थितीत आपलं राष्ट्रीय हित व आर्थिक सुरक्षा जपण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलेल”, असा इशारा भारतानं या निवेदनाच्या शेवटी दिला आहे.