पीटीआय, वाराणसी

भारत आणि मॉरिशस द्विपक्षीय व्यापार सक्षम करण्यासाठी स्थानिक चलनांचा वापर करतील, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी झालेल्या विस्तृत चर्चेनंतर सांगितले. माध्यमांना दिलेल्या निवेदनात पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील संबंधांवर प्रकाश टाकला. भारत आणि मॉरिशस हे दोन देश आहेत परंतु त्यांची स्वप्ने आणि नशीब एक असल्याचे त्यांनी सांगितले.

रामगुलाम सध्या भारताच्या राजकीय भेटीवर आहेत. रामगुलाम यांचा त्यांच्या वर्तमान कार्यकाळातील हा पहिलाच द्विपक्षीय परराष्ट्र दौरा आहे. ते अयोध्या आणि तिरुपतीलाही भेट देतील.

‘चागोस’ कराराबद्दल अभिनंदन

चागोस कराराच्या समाप्तीबद्दल पंतप्रधानांनी रामगुलाम आणि मॉरिशसच्या जनतेचे अभिनंदन केले. तसेच बेट राष्ट्राच्या सार्वभौमत्वासाठी हा ‘ऐतिहासिक विजय’ असल्याचे म्हटले. भारताने नेहमीच वसाहतवादमुक्ती आणि मॉरिशसच्या सार्वभौमत्वाला पूर्ण मान्यता देण्याचे समर्थन केले असून भारत मॉरिशसच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे ते म्हणाले.

मे महिन्यात, एका ऐतिहासिक करारानुसार, दिएगो गार्सियाच्या उष्णकटिबंधीय प्रवाळ भूमीसह चागोस बेटांचे सार्वभौमत्व मॉरिशसला सोपवण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला. या बेटांवरील आपले हक्क ब्रिटनने तब्बल ५० वर्षांनंतर सोडून दिले आहेत. या करारानुसार, धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या दिएगो गार्सियाच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ब्रिटनकडे असेल.

भारत मॉरिशसच्या विशेष आर्थिक क्षेत्राची सुरक्षा आणि सागरी क्षमता मजबूत करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. भारत नेहमीच हिंद महासागर क्षेत्रात प्रथम प्रतिसाद देणारा आणि सुरक्षा पुरवठादार म्हणून उभा राहिला आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान