पाकिस्तानचा निर्णय; पार्सल सेवा बंदच :- पाकिस्तानने भारताबरोबरची थांबवलेली टपाल सेवा पुन्हा सुरू केली आहे, मात्र पार्सल सेवा अजूनही बंदच आहे. गेले तीन महिने ही सेवा बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला होता.
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानने टपाल सेवा बंद केली होती पण ती पुन्हा सुरू करण्यात आल्याचे वृत्तपत्रातील बातम्यात म्हटले आहे. ५ ऑगस्ट रोजी भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करून त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केले होते. त्यानंतर पाकिस्तानने भारताशी असलेले राजनैतिक संबंध निम्न स्तरावर आणून भारतीय उच्चायुक्तांना मायदेशी पाठवले होते. त्याचवेळी पाकिस्तानने भारताशी दळणवळण व इतर व्यापार संबंध तोडले होते.
पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे की ‘टपाल सेवा आता सुरू करण्यात आली असून पार्सल सेवा अजूनही बंदच आहे. पाकिस्तानने टपाल सेवा अंशत सुरू केल्याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा मात्र केलेली नाही.’ फाळणी, युद्ध व सीमेवरील तणावाच्या सर्व काळात दोन्ही देशांतील टपाल सेवा सुरू होती पण आता ती बंद करण्याचा निर्णय हा अभूतपूर्व होता.
‘पाकिस्तान तो पाकिस्तान!
’दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ऑक्टोबरमध्ये असे सांगितले होते की, ‘पाकिस्तानने टपाल सेवा थांबवण्याचा निर्णय एकतर्फी असून त्यापूर्वी भारताला सूचना देण्यात आली नव्हती. पाकिस्तानचा हा निर्णय जागतिक टपाल संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करणारा आहे पण शेवटी पाकिस्तान तो पाकिस्तानच आहे.’