नवी दिल्ली : जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचे गेल्या वर्षीपेक्षा तब्बल ११ क्रमांकाने घसरण झाली आहे. जगातील १८० देशांमध्ये भारताचा क्रमांक १६१ इतक्या तळाला गेला आहे, तर शेजारी देश पाकिस्तानात प्रसारमाध्यमांना मिळणाऱ्या स्वातंत्र्यामध्ये थोडी सुधारणा होऊन त्यांचे स्थान ७ अंकांनी वर गेले आहे. पाकिस्तान या यादीमध्ये १५० व्या क्रमांकावर आहे. जगभरातील प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवणाऱ्या रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स (आरएसएफ) या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
भारताचा अन्य एक शेजारी देश श्रीलंकेमध्येही प्रसारमाध्यमांची स्थिती काही प्रमाणात सुधारली असून त्यांनी २०२२ च्या १४६ व्या स्थानावरून या वर्षी १३५ व्या स्थान मिळवले आहे. नॉर्वे, आर्यलड आणि डेन्मार्क हे देश पहिल्या तीन क्रमांकावर आहेत तर व्हिएतनाम, चीन आणि उत्तर कोरिया हे सर्वात तळाला आहेत. त्याआधीच्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये भारताचे स्थान १४२ वे होते.
आरएसएफ ही एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील बिगर-सरकारी संस्था असून ती दरवर्षी जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांक प्रसिद्ध करत असते. जगभरातील पत्रकार आणि प्रसारमाध्यमांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याची तुलना करणे हे या निर्देशांकाचे उद्दिष्ट आहे. प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे हे आपले ध्येय असल्याचे ही संस्था सांगते. संस्थेचे मुख्यालय पॅरिसमध्ये असून त्यांना संयुक्त राष्ट्रांनी सल्लागाराचा दर्जा दिलेला आहे.