वर्षभरात देशातील इंटरनेटच्या वेगात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. वर्षभरात भारतात ४जीची सेवा वेगाने विस्तारली आहे. मात्र असे असले तरी, इंटरनेटच्या वेगाच्या बाबतीत भारताला जगातील पहिल्या १०० देशांच्या यादीतही स्थान मिळालेले नाही. इंटरनेटचा वेग पडताळून त्याबद्दलची आकडेवारी जाहीर करणाऱ्या ओक्ला या संस्थेने ही माहिती दिली आहे. या यादीत नॉर्वे पहिल्या स्थानावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत जगात १०९ व्या क्रमांकावर आहे. तर ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारत ७६ व्या स्थानी आहे. २०१७ च्या सुरुवातीला भारतातील मोबाईल डाऊनलोडिंगचा सरासरी वेग ७.६५ एमबीपीएस (मेगा बाईट पर सेकंद) इतका होता. मात्र वर्षाच्या अखेरपर्यंत इंटरनेटच्या वेगात वाढ झाली. नोव्हेंबरमध्ये भारतातील मोबाईल इंटरनेट स्पीड ८.८० एमबीपीएस इतका होता, अशी ओक्लाची आकडेवारी सांगते. वर्षाच्या सुरुवातीचा इंटरनेट स्पीड लक्षात घेतल्यास इंटरनेटच्या वेगातील वाढ १५ टक्के इतकी आहे. नॉर्वेमध्ये मोबाईल इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक (६२.६६ एमबीपीएस) आहे. यानंतर नेदरलँड्स (५३.०१ एमबीपीएस) दुसऱ्या आणि आईसलँड (५२.७८ एमबीपीएस) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मोबाईल इंटरनेटच्या क्रमवारीत १०९ व्या क्रमांकावर असलेला भारत, ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत ७६ व्या क्रमांकावर आहेत. वर्षभरात भारतातील ब्रॉडबँडचा वेग जवळपास ५० टक्क्यांनी वाढला आहे. जानेवारी महिन्यात देशातील ब्रॉडबँडचा वेग १२.१२ एमबीपीएस इतका होता. नोव्हेंबरपर्यंत हा वेग १८.८२ एमबीपीएसवर जाऊन पोहोचला. ब्रॉडबँड इंटरनेटच्या वेगाचा विचार केल्यास सिंगापूर (१५३.८५ एमबीपीएस) पहिल्या क्रमांकावर आहे. तर आईसलँड (१४७.५१ एमबीपीएस) दुसऱ्या आणि हाँगकाँग (१३३.९४ एमबीपीएस) तिसऱ्या स्थानी आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India ranks 109th in mobile internet speed and 76th in fixed broadband ookla
First published on: 12-12-2017 at 10:22 IST