पीटीआय, संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे, यासाठी रशियाने भारत व ब्राझील यांना पाठिंबा दिला. या सदस्यत्वासाठी उभय देश सुयोग्य असल्याचे सांगून हे दोन्ही देश जागतिक स्तरावरील महत्त्वाची भूमिका बजावणारे असल्याचे रशियाने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ७७ व्या सत्रादरम्यान रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी शनिवारी सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दर्शवला.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या भाषणाच्या अवघ्या तासापूर्वी आमसभेला संबोधित करताना, लावरोव म्हणाले, की संयुक्त राष्ट्रे आणि सुरक्षा परिषदेने समकालीन वास्तव स्वीकारणे आवश्यक आहे. आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील देशांना सुयोग्य प्रतिनिधित्व दिले जावे. जेणेकरून सुरक्षा परिषद अधिक लोकशाहीवादी बनावी, अशी रशियाची अपेक्षा आहे. भारत आणि ब्राझील ही जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावणारी राष्ट्रे असून सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठी सुयोग्य देश आहेत. तसेच आफ्रिका खंडाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देशाची एकमताने आणि प्राधान्याने निवड व्हावी, असे रशियाला वाटते.

परिषदेची सद्यस्थिती

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या सुरक्षा परिषदेच्या पुनर्रचनेसाठी भारत दीर्घकाळापासून आग्रही आहे. सुरक्षा परिषदेत सध्या पाच स्थायी सदस्य आणि आमसभेद्वारे दोन वर्षांसाठी निवडले जाणारे दहा अस्थायी सदस्य देश आहेत. सध्या सुरक्षा परिषदेवर रशिया, ब्रिटन, चीन, फ्रान्स आणि अमेरिका हे पाच देश स्थायी सदस्य आहेत. महत्त्वाच्या ठरावांवर हे देश आपला नकाराधिकार (व्हेटो) वापरू शकतात.  समकालीन जगाचे वास्तव सुरक्षा परिषदेत प्रतिबिंबित होण्यासाठी आणि प्रतिनिधित्व व्यापक होण्यासाठी या परिषदेवरील स्थायी सदस्य देशांची संख्या वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.

‘भारत विकसनशील देशांचा आवाज’

न्यूयॉर्क : ‘‘जागतिक पातळीवरील सध्याच्या ध्रुवीकरणाच्या काळात भारताला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भारत हा जणू विकसनशील देशांचा आवाज’ बनला आहे,’’ असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विकसनशील देशांतर्फे भारत नेहमीच आवाज उठवतो. त्यांच्या ज्वलंत समस्यांकडे जगाचे लक्ष वेधत असतो, असेही त्यांनी सांगितले. जयशंकर यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभा सत्राला संबोधित करून, आपला न्यूयॉर्क दौरा संपवला.