नवी दिल्ली : यूट्यूबर्स रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मुखिजा यांनी ‘इंडियाज गॉट लॅटेंट’वरील त्यांच्या आक्षेपार्ह टिप्पण्यांसाठी राष्ट्रीय महिला आयोगाकडे लेखी माफी मागितली आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
अलाहाबादिया, मखिजा आणि शोचे निर्माते सौरभ बोथरा आणि तुषार पुजारी गुरुवारी येथे राष्ट्रीय महिला आयोगासमोर उपस्थित झाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही यूट्यूबर्सची अनेक तास चौकशी करण्यात आली.
दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोग अयोग्य भाषेचा वापर सहन करणार नाही, असे रहाटकर यांनी पत्रपरिषदेत सांगितले. तसेच तुषार पुजारी, सौरभ बोथरा, अपूर्व मखिजा आणि रणवीर अलाहाबादिया या चारही जणांनी टिप्पणीबाबत दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती दिली. त्यांच्या टिप्पणींचे सामाजिक परिणाम लक्षात घेऊन त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांनी आपली चूक कबूल करीत लेखी माफीनामा सादर केला असल्याचे रहाटकर यांनी सांगितले.
चंचलानीला जामीन
दरम्यान, गुवाहाटी उच्च न्यायालयाने प्रकरणात आशीष चंचलानीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणी शहर पोलिसांनी १० फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. चंचलानीची २७ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अनेक तास चौकशी केली होती. यापूर्वी गुवाहाटी पोलिसांनी शुक्रवारी रणवीर अलाहाबादिया याची याच प्रकरणात चौकशी केली होती.
तथापि, सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबादिया यांना अटकेपासून हंगामी संरक्षण दिले आहे. न्यायालयानेही या टिप्पण्या ‘अश्लील’ असल्याचे तसेच यांच्या घाणेरड्या विचारामुळे समाजाला लाज वाटते, असे म्हटले होते.