India vs Switzerland in UNHRC : संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) मानवाधिकार परिषदेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य व अल्पसंख्याकांबद्दलच्या मुद्यावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या स्वित्झर्लंडला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेच्या ६० व्या अधिवेशनात भारताचे राजदूत क्षितिज त्यागी स्वित्झर्लंडच्या प्रतिनिधींना म्हणाले, “आमच्या देशांतर्गत बाबींवर टिप्पणी करण्यापेक्षा तुमच्या देशातील वर्णभेद, धार्मिक भेदभाव, इतर देशांमधील नागरिकांप्रती घृणा यांसारख्या आव्हानांकडे द्या. तुमच्यासह युरोपातील देशांमधील या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी भारत तुमची मदत करण्यास नेहमीच तयार असेल.”

क्षितीज त्यागी म्हणाले, “स्वित्झर्लंडने इथे उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे. स्वित्झर्लंडसारख्या आमच्या जवळच्या मित्राने आणि व्यावसायिक भागीदाराने अशा प्रकारे चुकीच्या आणि वरवरच्या टिप्पण्या करणं आश्चर्यकारक आहे.”

जबरदस्तीने लादलेलं निवेदन करून मानवाधिकार परिषदेचा वेळ वाया घालवू नका : भारत

स्वित्झर्लंड सध्या मानवाधिकार परिषदेचं अध्यक्षपद भूषवत आहे. याकडे लक्ष वेधत त्यागी म्हणाले, भारतातील वास्तवाशी संबंध नसलेलं आणि जबरदस्तीने लादलेलं निवेदन करून या परिषदेचा वेळ वाया घालवू नका. भारत ही जगातील सर्वात मोठी, सर्वाधिक विविधतेने नटलेली लोकशाही आहे. आमची संस्कृती खूप पुरातन आहे जी बहुविधतेचं स्वागत करते.”

स्वित्झर्लंडचा भारताला चिमटा

स्वित्झर्लंडने मानवाधिकार परिषदेत वेगवेगळ्या देशांमधील, भागांमधील मानवाधिकारांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली होती, ज्यामध्ये भारताचाही उल्लेख करण्यात आला होता. स्वित्झर्लंडचे राजदूत मायकेल मेअर आपलं निवेदन सादर करत म्हणाले होते की “भारताकडे आम्ही खूप आशेने पाहात आहोत. त्यांनी त्यांच्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माध्यम स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रभावी योजना करायला हव्यात.”

मेयर यांनी यावेळी सर्बियामधील निदर्शनांदरम्यान झालेली हिंसा, सीरियातील महिलांचं अपहरण, तुर्कीयेमधील सार्वजनिक ठिकाणी लोकांनी एकत्र येण्यावर घातलेले निर्बंध यांसारखे मुद्दे उपस्थित करत चिंता व्यक्त केली.

पाकिस्तानलाही सुनावलं

दरम्यान, स्वित्झर्लंडच्या मुद्द्याचं समर्थन करत पाकिस्तानने देखील आपलं निवेदन दिलं. त्यावर त्यागी म्हणाले, जागतिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या नेटवर्कला आर्थिक मदत करणाऱ्या, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या किंवा दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांकडून काही शिकण्याची आम्हाला गरज नाही.”