खलिस्तानवादी फुटीरतावादी नेता गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचण्यात भारतीय रिसर्च आणि ॲनालिस विंग (रॉ)चा अधिकारी सामील होता, असा दावा वॉशिंग्टन पोस्टने केला होता. या बातमीवर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे. रॉच्या अधिकाऱ्याने पन्नूचा खात्मा करण्यासाठी एका पथकाला काम दिले होते, असा दावा या बातमीत केला गेला होता. ही बातमी आतार्किक आणि बेजबाबदार असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

वॉशिंग्टन पोस्टने आपल्या बातमीत विक्रम यादव या माजी रॉच्या अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख केला आहे. विक्रम यादव यांनी गुरपतवंत सिंग पन्नू याची अमेरिकेच्या भूमीत हत्या करण्यासाठी कट रचला आणि त्यासाठी हल्लेखोरांची जुळवाजुळव केली, असा दावा केला आहे. गुरपतवंत सिंग पन्नू सध्या अमेरिकेत राहत असून भारताने त्याचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केलेले आहे.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या बातमीला अस्वीकाहार्य आणि बेजबाबदार म्हणत टीका केली आहे.

रणधीर जयस्वाल पुढे म्हणाले की, अमेरिकेने मागेच उपस्थित केलेल्या सुरक्षा आणि अतिरेक्यांच्या साखळीच्या प्रश्नाबाबत भारताने उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. दरम्यान मध्येच वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या बेजबाबदार दाव्यामुळे या तपासाला काहीही मदत होणार नाही.

कोण आहे निखिल गुप्ता? खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा अमेरिकेचा आरोप

मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘फायनान्शियल टाइम्स’ने अशाच प्रकारचे वृत्त दिले होते. अमेरिकेच्या भूमीवर गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी निखिल गुप्ता या ५२ वर्षीय भारतीय नागरिकाला अटक करण्यात आले होते. अमेरिकेच्या मॅनहॅटन न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले की, निखिल गुप्ता याने पन्नूची हत्या करण्यासाठी हल्लेखोर नेमले. एका भारतीय अधिकाऱ्याने त्याला हे काम दिले होते. या अधिकाऱ्याचे नाव तेव्हा समोर आले नव्हते. मात्र त्याचा उल्लेख “सीसी – १” असा केला जात असल्याचे सांगण्यात आले.

वॉशिंग्टन पोस्ट आता दिलेल्या बातमीत “सीसी – १” हेच विक्रम यादव असल्याचा दावा केला आहे.

गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्तेचा कट रचल्याचा आरोप ठेवून अमेरिकेच्या आदेशानंतर चेक प्रजासत्ताकच्या अधिकाऱ्यांनी ३० जून २०२३ रोजी निखिल गुप्ताला अटक केली होती. निखील गुप्ताला “सीसी – १” असे सांकेतिक नाव असलेल्या भारतीय अधिकाऱ्याकडून हत्या करण्याची सूचना मिळाली होती. या सूनचेनुसार गुप्ताने हल्लेखोराला माहिती पुरविली. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही हत्या करण्यासाठी निखील गुप्ताने हल्लेखोराला एक लाख डॉलर देण्याचे मान्य केले होते. त्यापैकी ९ जून २०२३ रोजी १५ हजार डॉलर आगाऊ देण्यात आले होते.