आसाम राज्यात सध्या पुराच्या तडाख्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुरामुळे निम्म्याहून अधिक जिल्हे पाण्याखाली गेल्याने आसाममधील पूरस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. पुरात काही जण मरण पावले असून ४.२३ लाख लोक बाधित झाले आहेत. या घटनेत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी देखील झाली आहे. त्यामुळे आसाममधील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सुवर्ण पदक विजेती भारतीय धावपटू हिमा दास हिने मदतीचा हात पुढे केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धावपटू हिमा दास सध्या चेक रिपब्लिकमध्ये Kladno Athletics Meet साठी गेली आहे. मात्र असे असूनही हिमाने सामाजिक भान राखले आहे. तिने तिच्या महिन्याच्या वेतनातील अर्धे वेतन पूरग्रस्तांना मदत म्हणून दिले आहे. याशिवाय हिमाने इतर नागरिकांना देखील आसाम पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. ‘आसाममध्ये पूरपरिस्थिती आहे. तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ३३ पैकी ३० जिल्हे पुरामुळे बाधित आहेत. त्यामुळे मी कार्पोरेट कंपन्या, मोठे उद्योजक आणि सामान्य नागरिकांना विनंती करते की त्यांनी आसाम पूरग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात द्यावा’, असे तिने ट्विट केले आहे.

आसाममध्ये पुराचे पाणी लोहमार्गात शिरल्याने रेल्वे प्रशासनाला लमडिंग-बादरपूर मार्गावरील सेवा नियंत्रित ठेवणे भाग पडले आहे. धेमाजी, लखीमपूर, विश्वनाथ, नलबारी, चिरांग, गोलाघाट, मजुली, जोरहाट, दिब्रुगड, नागाव, मोरीगाव, कोक्राझर, बोंगाईगाव, बाकसा, सोनितपूर, दरांग आणि बारपेटा हे जिल्हे बाधित झाल्याचे आसामच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे. पुराचा सर्वाधिक तडाखा बारपेटाला बसला असून ८५ हजार जण बाधित झाले आहेत. जवळपास ४१ महसूल परिमंडळातील ८०० गावे पाण्याखाली असून दोन हजार बाधितांना ५३ मदत छावण्यांमध्ये हलविण्यात आले आहेत. आसाममधील लोकप्रिय काझीरंगा राष्ट्रीय उद्यानालाही फटका बसला असून वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी तेथून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर प्रशासनाला उपाययोजना आखावी लागली आहे, तर गोलघाट प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India sprinter hima das assam flood financial help cm relief fund vjb
First published on: 17-07-2019 at 13:21 IST