भारताच्या पृथ्वी २ या स्वदेशी बनावटीच्या  क्षेपणास्त्राची उपयोजित चाचणी यशस्वी झाली आहे, या क्षेपणास्त्राची क्षमता ५०० ते १००० किलोची क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची असून चंडीपूर येथील चाचणी क्षेत्रावरून ते उडवण्यात आले. चलत प्रक्षेपकाच्या मदतीने एकात्मिक चाचणी क्षेत्राच्या संकुल तीन येथून सकाळी १० वाजता या क्षेपणास्त्राचे उड्डाण करण्यात आले व त्याने अचूक लक्ष्यभेदही केला, असे संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या क्षेपणास्त्राचा मारक पल्ला ३५० किलोमीटरचा असून त्याची क्षमताही वजनदार अस्त्रे वाहून नेण्याची आहे. त्याच्या दोन इंजिनांमध्ये द्रव इंधनाचा वापर करण्यात आला आहे. लक्ष्य शोधण्यासाठी या क्षेपणास्त्रात प्रगत दिशादर्शन प्रणालीचा वापर केलेला आहे. चाचणी उड्डाणातील माहितीचे विश्लेषण करण्यात येत आहे. स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली असून क्षेपणास्त्राच्या साठय़ातून कुठलेही क्षेपणास्त्र निवडून त्याची चाचणी केली जाते. संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्र चाचणीचे निरीक्षण केले. क्षेपणास्त्राचा मार्ग संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे रडार, विद्युत प्रकाशीय मागोवा यंत्रणा, दूरसंवेदन केंद्रे यांच्या मदतीने निश्चित करण्यात आला. हे क्षेपणास्त्र लक्ष्यभेद केल्यानंतर बंगालच्या उपसागरात कोसळल्याचे तेथील जहाजावरून निरीक्षण करणाऱ्यांनी सांगितले. पृथ्वी २ क्षेपणास्त्र २००३ मध्ये भारताच्या लष्करी दलांमध्ये समाविष्ट करण्यात आले असून भारताच्या एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात तयार केलेले ते पहिले क्षेपणास्त्र मानले जाते, आता ते तंत्रज्ञानाने परिपूर्ण असून त्याबाबत कुठलीही शंका उरलेली नाही. अशा प्रकारची क्षेपणास्त्र उड्डाणे भारताच्या प्रत्यक्ष कार्यात्मक सज्जतेची साक्ष देतात व आपल्याकडे असलेली सगळी क्षेपणास्त्रे गुणवत्तेत कुठेही कमी नाहीत हेच यातून स्पष्ट होते. पृथ्वी २ क्षेपणास्त्राची यापूर्वीची उपयोजित चाचणी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी ओदिशातील याच चाचणी क्षेत्रातून घेण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India successfully test fires n capable prithvi ii missile
First published on: 17-02-2016 at 03:01 IST