देश आणि सर्व राज्य एकाच सध्या एकाच गोष्टीमुळे चिंतेत आहे. ती म्हणजे करोनाग्रस्तांचा वाढत चाललेला आकडा आणि मृतांची संख्या. भारतात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर काही राज्यांपाठोपाठ केंद्र सरकारनं तातडीनं लॉकडाउनची घोषणा केली. त्यामुळे देशातील जनजीवन ठप्प आहे. सध्या लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरू आहे. लॉकडाउनमुळे करोनाच्या प्रसारावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. करोनाग्रस्तांची संख्या गेल्या आठ दिवसात देशातील आकडा दुप्पट झाला असला, व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा तो खूप कमी आहे.

देशात सध्या सर्वाधिक करोना बाधित रुग्णांची सख्या महाराष्ट्रात आहे. राज्यातील रूग्णांची संख्या ५ हजार २१८ इतकी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर गुजरातचा क्रमांक आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रात मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी देशातील एकूण रुग्णांपैकी एकतृतीयांश रुग्ण आढळून आले. ५५२ जणांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं. तर सोमवारी राज्यात ४६६ रुग्ण सापडले होते. करोनानं भारतात पाऊल ठेवल्यानंतर देशात रविवारी आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळले होते. रविवारी देशात १५७७ रुग्ण सापडले होते. यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले.

अशी मंदावली रुग्णांची संख्या…

गेल्या काही दिवसात करोनाच्या प्रसारावर लॉकडाउनचा परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. देशातील रुग्णसंख्या १० हजारांवरून २० हजार अशी दुप्पट झाली असली तरी त्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागला आहे. लॉकडाउन लागू होण्याआधी देशात करोनाचा प्रसाराचा प्रचंड वाढला होता. मार्चच्या सुरूवातील देशात तीन रुग्ण होते. तीनवरून हा आकडा शंभरवर जाण्यासाठी दोन आठवडे लागले. त्यानंतर रुग्णांची संख्या १००० वर जाण्यासाठी दोन आठवडे लागले. तर दहा हजार आकडा गाठण्यासाठी दोन आठवड्यांहून अधिक कालावधी लागला. तर आठ दिवसांत हा आकडा २० हजारांवर पोहोचला. जर लॉकडाउन लागू करण्यात आला नसता. त्याचबरोबर सरकारनं उपाययोजना केल्या नसत्या, तर भारतातील करोनाग्रस्तांचा आकडा महिनाअखेरीपर्यंत लाखांच्या घरात पोहोचला असता. तसा अंदाजही करोनाच्या प्रसाराच्या वेगाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी व्यक्त केला होता. मात्र, लॉकडाउनमुळे महिनाअखेरीपर्यंत देशातील करोनाग्रस्तांचा आकडा २५ हजार ते ३० हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.