अण्वस्त्रसज्जतेत आणखी एक पाऊल पुढे टाकत भारताने सोमवारी लांब पल्ल्याच्या अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्राची सोमवारी बंगालच्या उपसागरात यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता तब्बल दोन हजार कि.मी. इतकी आहे. या चाचणीमुळे भारत काही मोजक्या देशांच्या पंक्तीत पोहोचला आहे.
बंगालच्या उपसागरात पाणबुडीतून सोडण्यात आलेल्या या आंतरखंडीय क्षेपणास्त्राने सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार केल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
भारताने विकसित केलेल्या पाण्याखालून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या यादीतील हे सर्वात लांबपर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. यामुळे जमिनीवरून, हवेतून तसेच पाण्याखालून मारा करण्याची क्षमता आता भारताने मिळवली आहे. संरक्षणमंत्री ए. के. अंटोनी यांनी या यशाबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.