नवी दिल्ली : झायडस कॅडिलाची ‘झायकोव्ह-डी’ ही करोना प्रतिबंधक लस सुरुवातीला महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये वापरली जाईल. ज्या ठिकाणी करोना प्रतिबंधक लशीची एकही मात्रा न मिळालेल्यांची संख्या मोठी आहे असे जिल्हे निश्चित करून तेथे आधी ही लस देण्यासाठी या राज्यांची शिफारस करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या ‘हर घर दस्तक’ या मोहिमेची सद्यस्थिती आणि प्रगती यांचा केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिव, तसेच राष्ट्रीय आरोग्य मिशनचे (एनएचएम) संचालक यांच्यासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये गुरुवारी आढावा घेतला. ज्या जिल्ह्य़ांतील लोक मोठय़ा संख्येत करोनाच्या पहिल्या मात्रेपासून वंचित राहिले आहेत, असे जिल्हे झायकोव्ह-डी लस देण्यासाठी निश्चित करावे, अशी सूचना भूषण यांनी केल्याचे आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्र, बिहार, झारखंड, पंजाब, तमिळनाडू, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल ही ती सात राज्ये आहेत.

१२ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी भारताच्या औषध नियामकांची मंजुरी मिळालेली पहिली लस असलेली झायकोव्ह-डी ही सुरुवातीला सात राज्यांतच दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

झायकोव्ह-डी लस देण्यासाठी राष्ट्रीय प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचेही या निवेदनात नमूद केले आहे.