MEA Advisory For Indian Nationals over Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून (फेब्रुवारी २०२२ पासून) युद्ध चालू आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने नागरिकांसाठी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय तरुणांना आवाहन केलं आहे की “रशियन लष्करात दाखल होण्यासंदर्भातील कुठलाही प्रस्ताव स्वीकारू नका, रशियन सैन्यात सामील होण्यासाठी चालू असलेल्या कोणत्याही फसव्या प्रयत्नांना बळी पडू नका.”
परराष्ट्र मंत्रालयाने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर मार्गदर्शक सूचनांस्दर्भात पोस्ट केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अशा बातम्या समोर येत आहेत की भारतीयांना रशियन सैन्यात भरती करून त्यांचा युक्रेनविरोधातील युद्धात वापर केला जात आहे. अवघ्या काही पैशांच्या बदल्यात भारतीय तरुण या युद्धात सहभागी होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. केंद्र सरकार या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहात आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की “भारीय तरुणांनी रशियन सैन्यात भरती होऊ नये, तसा कुठलाही प्रस्ताव स्वीकारू नये. अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये.”
दरम्यान, भारत सरकारने रशियाला विनंती केली आहे की कुठल्याही फसवणुकीला बळी पडून रशियन सैन्यात दाखल झालेल्या भारतीयांना परत पाठवावं.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचं म्हणणं काय?
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी रशियन सैन्यात भारतीय तरुणांच्या भरतीवरून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं. ते म्हणाले, “भारतीय नागरिकांनी अशा प्रकारच्या प्रस्तावांपासून दूर राहावं, कारण यात खूप धोके आहेत. अलीकडच्या काळात यासंदर्भातील बातम्या आम्ही पाहिल्या आहेत. गेल्या वर्षभरात आम्ही अनेक वेळा अशा कारवाईतील धोके व संकटांविषयी माहिती जाहीर केली आहे. तसेच अनेक वेळा भारतीय नागरिकांना या सगळ्यापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.”
जायस्वाल म्हणाले, “आम्ही दिल्ली व मॉस्कोमधील रशियन अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली आहे. आम्ही रशियाला विनंती केली आहे की अशा प्रकारे भारतीय तरुणांना रशियन लष्करात दाखल करून घेणं थांबवावं. तसेच जे भारतीय रशियन लष्करात दाखल झाले आहेत त्यांना परत पाठवावं. यासह आम्ही जे भारतीय तरुण रशियाला गेले आहेत त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आहे. तसेच पुन्हा एकदा भारतीय नागरिकांना आवाहन करतो की रशियन लष्करात दाखल होऊ नका, तसा कुठलाही प्रस्ताव स्वीकारू नका.”