कमला हॅरीस यांच्याशी द्विपक्षीय प्रश्नांवर चर्चा

भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार देश असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरीस यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान सांगितले. दोन्ही देशांतील सामरिक भागीदारी आणखी वृद्धिंगत करण्याचे यावेळी मान्य करण्यात आले.

लोकशाही व्यवस्थांना असलेले धोके, हिंद-प्रशांत क्षेत्र यावरही उभयतांत चर्चा झाली. मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत व अमेरिका हे नैसर्गिक भागीदार असून दोन्ही देशांचे काही समान भूराजकीय हितसंबंध आहेत.

कमला हॅरीस या भारतीय वंशाच्या पहिल्या अमेरिकी उपाध्यक्षा असल्याने दोन्ही नेत्यांच्या बैठकीला विशेष महत्त्व होते.

भारत व अमेरिका हे मोठ्या व जुन्या लोकशाही देशांचे प्रतिनिधित्व करतात असे सांगून मोदी म्हणाले की, दोन्ही देशांची लोकशाही मूल्ये समान असून त्यांच्यातील समन्वय दिवसेंदिवस वाढतच राहील. मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, आम्ही भारत व अमेरिका संबंधातील बहुविध पैलूंवर चर्चा केली. मोदी यांनी सांगितले की, अमेरिकेने बायडेन- हॅरीस प्रशासनाच्या काळात अनेक अवघड आव्हानांना तोंड दिले. त्यात कोविड साथ, हवामान बदल, क्वाड गट  या मुद्द्यांवर मोठी प्रगती  केली. दोन्ही नेत्यांनी अफगाणिस्तानसह अनेक जागतिक घडामोडींवर चर्चा केल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

जगातील अनेक देशांत सध्या लोकशाही धोक्यात असून भारत आणि अमेरिका यांनी लोकशाही तत्वे व लोकशाही संस्था यांच्या रक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे आवाहन अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरीस यांनी केले आहे.

हॅरीस दाम्पत्यास भारत भेटीचे निमंत्रण

मोदी यांनी सांगितले की, कमला हॅरीस या जगातील अनेक लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत. दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होत राहतील व बायडेन-हॅरीस प्रशासनाच्या काळात ते एक नवी उंची गाठतील.  दोन्ही नेत्यांनी पत्रकारांना सामोरे जाताना मुखपट्ट्या परिधान केल्या होत्या. पंतप्रधान मोदी यांनी हॅरीस दाम्पत्यास भारत भेटीचे निमंत्रण दिले.