मागील काही महिन्यांपासून देशात महागाई सातत्याने वाढत आहे. महागाईच्या बाबतीत दररोज नवनवीन विक्रम प्रस्थापित केले जात आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात घाऊक महागाईचा दर १५.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा आकडा मागील दहा वर्षांतील सर्वाधिक आहे.

मंत्रालयाकडून जारी केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक (WPI) १३.११ टक्क्यांवर होता. तर मार्चमध्ये हाच निर्देशांक १४.५५ टक्क्यांवर पोहोचला होता. तर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये घाऊक किंमत निर्देशांक १०.७४ टक्के इतका होता. विशेष म्हणजे मागील १३ महिन्यांपासून घाऊक महागाई दर दोन अंकी नोंदला आहे. त्यामुळे देशात महागाईचं संकट किती भीषण रुप घेत आहे, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

खनिज तेल, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, अन्नपदार्थ आणि रसायनांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे एप्रिल महिन्यात महागाई दर वाढला असल्याचं सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

खाद्यपदार्थांवरही महागाई वाढली
मंत्रालयाकडून जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये खाद्यपदार्थांवरील महागाईचा दर ८.३५ टक्के नोंदला आहे. हाच दर मार्च महिन्यात ८.०६ टक्के इतका होता. भाज्यांच्या किमतीत वाढ झाल्याने खाद्यपदार्थांवरील महागाई दर वाढला असल्याचं संबंधित अहवालात म्हटलं आहे.

एप्रिलमध्ये भाज्यांचा महागाई दर २३.२४ टक्के नोंदला आहे, हा दर मार्चमध्ये १९.८८ टक्के इतका होता. एप्रिल महिन्यात बटाट्याचे भाव १९.८४ टक्क्यांनी वाढले तर कांद्याचे भाव ४.०२ टक्क्यांनी घसरले आहेत. यासोबतच फळांचा महागाई दर मार्चमध्ये १०.६२ टक्के होता. एप्रिलमध्ये हा दर १०.८९ टक्क्यांपर्यंत वाढला. दुसरीकडे, गव्हाच्या किमतीत देखील १०.७० टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. तसेच अंडी, मांस आणि मासे यांच्या किमतीतही ४.५० टक्क्यांची वाढ नोंदली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीही वाढल्या
इंधन आणि उर्जा क्षेत्रातील महागाई दरात ३८.६६ टक्क्यांची वाढ झाली आहे. हा दर मार्चमध्ये ३४.५२ टक्के होता. दरम्यानच्या काळात एलपीजी गॅसच्या किमतीत देखील ३८.४८ टक्क्यांची वाढ झाली आहे.