Air force fighter jet crashes: राजस्थानच्या चुरू येथे भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळल्याची घटना नुकतीच घडली आहे. या दुर्घटनेनंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. रतनगड तहसीलमधील भानोदा गावातील राजलदेसर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघातावेळी दोन वैमानिक विमानात उपस्थित होते. या दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात दिली आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात मोठा आवाज ऐकू आला. त्यानंतर आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसू लागले. हा स्फोट भानोदा गावानजीक घडला. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. हवाई दलाकडून चौकशी केल्यानंतर अधिकृत माहिती देण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

चुरू जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जय यादव यांनी माहिती देताना म्हटले, आज दुपारी १२.३० वाजता भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले. प्राथमिकदृष्ट्या विमानात दोन वैमानिक असल्याची माहिती मिळाली. दरम्यान सोशल मीडियावर घटनास्थळाचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये स्थानिकांनी दुर्घटनास्थळी गर्दी केल्याचे दिसत आहे.

हवाई दलाने काही वेळापूर्वी केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले की, भारतीय हवाई दलाच्या जॅग्वार लढाऊ विमानाचा नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान राजस्थानच्या चुरूजवळ अपघात झाला. दोन्ही वैमानिकांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तीन महिन्यातली दुसरी घटना

तीन महिन्यात लढाऊ विमान कोसळल्याची ही दुसरी घटना घडली आहे. एप्रिल महिन्यातही भारतीय हवाई दलाचे दोन आसनी जॅग्वार विमान गुजरातच्या जामनगर जिल्ह्यात कोसळले होते. ज्यात एका वैमानिकाचा मृत्यू झाला होता. जॅग्वार विमानाचे प्रशिक्षणार्थ उड्डाण घेतले असताना हा अपघात घडला होता. जामनगर शहरापासून अवघ्या १८ किमी अंतरावर हे विमान कोसळले होते.