दहशतवादी संघटनेशी संबंध  असल्याच्या संशयावरून चीनमध्ये २० पर्यटकांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका भारतीय नागरिकाचा समावेश असून उर्वरित पर्यटकांमध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांचा समावेश आहे. दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून या पर्यटकांना चीनमध्ये अटक करण्यात आली आहे. ब्रिटनमधील परराष्ट्र विभाग आणि दक्षिण आफ्रिकेतील एका चॅरिटी ग्रुपने या माहितीला दुजोरा दिला आहे.
सर्व पर्यटक बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा प्रचार करणारा व्हिडिओ एका हॉटेलमध्ये पाहात होते, असा दावा चीनने केला आहे.
अटक करण्यात आलेल्यांपैकी ११ पर्यटकांची चौकशीनंतर सुटका करण्यास चीनने तयारी दर्शविली आहे. १७ जुलैला या ११ पर्यटकांची सुटका करण्यात येणार आहे, तर उर्वरित ९ पर्यटकांवर कोणतेही आरोपपत्र दाखल न करता चौकशीसाठी मंगोलियामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यामध्येदक्षिण आफ्रिकेतील पाच, ब्रिटनमधील तीन आणि एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे. पर्यटकांच्या मदतीसाठी काउंसलर स्टाफ चीनमध्ये पाठवण्यात आल्याचे ब्रिटनच्या परराष्‍ट्र विभागाने सांगितले आहे.