गेली काही महिने चीनच्या सीमेवरील तणाव लक्षात घेता आणि दोन्ही सीमेवर लढाई करण्याची वेळ आली तर तयारीच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी संरक्षण दल लष्करासाठी दक्षिण कोरियाचे तंत्रज्ञान असलेल्या आणखी २०० K-9 तोफा विकत घेणार आहे. यासाठी लवकरच भारतात या तोफांची निर्मिती करणाऱ्या लार्सन अँड टुर्बोला २०० तोफांची ऑर्डर दिली जाणार असल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

लष्करात १९९० च्या दशकानंतर नवीन तोफा या दाखल झाल्या नव्हत्या. बदलती परिस्थिती, सीमेवरील देशांची युद्धसज्जता लक्षात घेता गेल्या काही वर्षात विविध प्रकारच्या तोफा या लष्करात दाखल होण्यास सुरुवात झाली. यामध्ये भारतीय बनावटीची बोफोर्स सदृश्य ‘धनुष’ तोफ, अमेरिकेची M777 या दोन नवीन तोफांबरोबर दक्षिण कोरीयाचे तंत्रज्ञान असलेली स्वयंचलित K-9 तोफ लष्करात दाखल झाली. तंत्रज्ञान हस्तांतराचा करार होत लार्सन अँड टुर्बोच्या सहाय्याने भारतातच या तोफांची निर्मिती करण्यात आली. ‘वज्र’ असे नावही या तोफेला देण्यात आले आहे.

आणखी २०० वज्र का ?

दरम्यान या तोफांची उत्तम अशी कामगिरी लक्षात घेता आणि त्यातच सीमेवरील गेल्या काही महिन्यांतील बदलेली परिस्थिती लक्षात घेता लष्कराला आणखी तोफांची निकड भासू लागली आहे. म्हणूनच २०० K-9 तोफांची ऑर्डर लवकरच दिली जाणार असल्याची माहिती आहे. वर्ष २०२८ पर्यंत या २०० तोफा लष्करात दाखल होतील असा अंदाज आहे. एकुण १० हजार कोटी रुपये यासाठी मोजावे लागणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताच्या सीमेवरील विविध भौगोलिक परिस्थितीमध्ये वज्रने वाळवंटासारख्या ठिकाणी आणि लडाखसारख्या अतिउंचावर देखील चांगली क्षमता दाखवून दिली आहे. विशेषः चीनच्या सीमेवर असलेला तणाव लक्षात घेता दीर्घकालीन बळकटीकरता आणखी तोफांची आवश्यकता लष्कराला लागणार आहे. तब्बल ५४ किलोमीटर पर्यंत अचूक मारा करण्याची वज्रची क्षमता आहे.