इतर देशांमध्ये भारतीयांना स्थानिकांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याची काही प्रकरणं आजपर्यंत ऐकिवात आली आहेत. त्या त्या वेळी भारत सरकारने संबंधित प्रकरणात आपला निषेध नोंदवणं आणि योग्य ती कार्यवाही देखील केली आहे. मात्र, एका भारतीयाकडूनच दुसऱ्या भारतीयाला त्याच्या भारतीय होण्याबद्दल हेटाळणीचा, तिरस्काराचा आणि अपमानास्पद वागणुकीचा प्रकार कॅलिफोर्नियामध्ये घडला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला असून त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या व्यक्तीविरोधात स्थानिक पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

नेमकं घडलं काय?

हा सगळा प्रकार २१ ऑगस्टचा असून याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा खुलासा झाला. कॅलिफोर्नियाच्या टॅको बेल नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला. ३७ वर्षीय तेजिंदर सिंग नावाच्या एका अमेरिकन-भारतीय व्यक्तीने कृष्णन जयरामन नावाच्या भारतीय व्यक्तीला अपमानास्पद वागणूक दिल्याचं आणि आक्षेपार्ह शब्दांत शिवीगाळ केल्याचंदेखील व्हिडीओमध्ये दिसत आहे.

कृष्णन आपली जेवणाची ऑर्डर घेण्यासाठी काऊंटरवर आल्यानंतर या दोघांमध्ये वाद झाला. त्यावरून तेजिंदरनं कृष्णनला शिवीगाळ करायला सुरुवात केली. “तुम्ही हिंदू गायीच्या गोमूत्रामध्ये आंघोळ करतात. भारतीय लोक म्हणजे एक विनोद आहे. या मूर्खाकडे जरा बघा”, अशा शब्दांत तेजिंदरने बोलायला सुरुवात केली. Disgusting, Dog असा उल्लेख करत तेजिंदरनं शिवीगाळ केल्याचंदेखील व्हिडीओमध्ये दिसत आहे.

कृष्णनच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

दरम्यान, थोड्या वेळाने तेजिंदरचे शब्द आणि बोलण्याची पद्धत बघून तो भारतीयच असल्याचं आपल्या लक्षात आल्याचं कृष्णनचं म्हणणं आहे. “मला एकीकडे संताप येत होता, पण दुसरीकडे भीतीही वाटत होती. जर तो रागाच्या भरात मला मारायला आला असता तर मी काय केलं असतं? मी पोलिसांना धन्यवाद देईन की त्यांनी लागलीच मला मदत केली आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला”, असं ट्वीट कृष्णन यानं केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी तेजिंदरविरोधात गुन्हा दाखल करतानाच अशा प्रकारच्या घटना ताबडतोब कळवण्याचं आवाहनदेखील केलं आहे.