ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेडमध्ये एका २३ वर्षीय बभारतीय तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. चरणप्रीत सिंग असं या तरुणाचं नाव असून स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणात चरणप्रीत सिंगने पोलिसांत तक्रार दाखल केली असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पण हा प्रकार वर्णभेदातून झाल्याचा आरोप करत चरणप्रीतनं न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. नाईन न्यूजच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सनं हे वृत्त दिलं आहे.

नेमक काय घडलं?

शविवारी रात्री चरणप्रीत सिंग त्याच्या पत्नीसह मध्य अॅडलेड भागातील किंतोर अव्हेन्यू येथे आला होता. या भागातील आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी इथे नागरिकांची नेहमीच गर्दी होत असते. त्या दिवशी चरणप्रीतदेखील त्याचसाठी या भागात आला होता. गाडी एका ठिकाणी उभी करून ते दोघे तिथेच रोषणाईचा आनंद घेण्यात मग्न झाले. मात्र, तेवढ्यात त्यांच्या बाजूला आणखी एक कार येऊन थांबली. त्यातून पाच व्यक्ती उतरल्या. काहींच्या हातात चाकूसारखी तीक्ष्ण हत्यारे होती. त्यांनी चरणप्रीतला त्याची कार बाजूला घ्यायला सांगितलं.

त्यांच्यात बाचाबाची सुरू होताच त्या व्यक्तींनी अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. “भारतीयांनो, चालते व्हा”, असं ते म्हणू लागले. त्यानंतर लागलीच त्यांनी चरणप्रीतला मारहाण करायला सुरुवात केली. कारमध्ये बसलेल्या चरणप्रीतला त्यांनी बाहेरूनच मारायला सुरुवात केली. त्यांनी हातातली शस्त्रांनीही चरणप्रीतवर वार केले. “मी त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण मी बेशुद्ध होईपर्यंत ते मारहाण करत राहिले”, अशी प्रतिक्रिया चरणप्रीतने नाईन न्यूजला दिली.

चेहऱ्यावर फ्रॅक्चर, गंभीर दुखापत

चरणप्रीतला उपचारांसाठी रॉयल अॅडलेड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्याला प्रचंड मानसिक धक्का बसल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. त्याचबरोबर चेहऱ्यावर काही हाडांना फ्रॅक्चर, नाकाचं हाड तुटलेलं, डोळ्यांना गंभीर दुखापत अशा गोष्टींचं निदान करण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावर सर्जरीही केली गेली.

साऊथ ऑस्ट्रेलिया पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा चरणप्रीत जमिनीवर गंभीर दुखापतग्रस्त अवस्थेत पडला होता. दाखल झालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला. रविवारी सकाळी पोलिसांनी एनफिल्ड भागातून एका २० वर्षीय तरुणाला अटक केली. चरणप्रीतला मारहाण केल्याचा गु्न्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीला नंतर जामीनही मंजूर करण्यात आला. तसेच, इतर चौघांचा शोध घेतला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुम्ही सगळं बदलू शकता, पण रंग नाही”

दरम्यान, या हल्ल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असताना चरणप्रीतनं प्रतिक्रिया दिली आहे. “अशा गोष्टी जेव्हा घडतात, तेव्हा वाटतं की इथून परत निघून जावं. तुम्ही तुमच्या शरीराचे इतर अवयव बदलू शकता, पण रंग बदलू शकत नाही”, असं तो म्हणाला.