भारतीय वंशाच्या दिनेश चावला या हॉटेल व्यावसायिकाला अमेरिकेच्या एका विमानतळावर सामान चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. 18 ऑगस्ट रोजी चावला यांना गुन्हा कबूल केल्यानंतर विमानतळ पोलिसांनी अटक केली, त्यानंतर त्यांना 5 हजार डॉलरच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कुटुंबीयांच्या हॉटेल व्यवसायातही चावला हे भागीदार होते. यावर्षीच्या सुरुवातीलाच चावला यांची ट्रम्प कुटुंबीयांसोबतची भागीदारी संपुष्टात आली.

‘चावला हॉटेल्स’चे सीईओ दिनेश चावला हे अमेरिकेतील मिसिसिपीच्या क्लीवलँडचे रहिवासी आहेत. गेल्या आठवड्यात मेम्फिस विमानतळावर चोरीच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. विमानतळावरील ‘बॅगेज बेल्ट’मधून चोरलेली एक सूटकेस कारमध्ये ठेवली आणि त्यानंतर विमान प्रवासासाठी पुन्हा विमानतळावर प्रवेश केला असा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिसांनी चोरीचं सामान चावला यांच्या कारमधून हस्तगत केलं आहे.

दरम्यान, मेम्फिस विमानतळावर परतल्यानंतर चावला यांनी गुन्हा कबूल केला, त्यानंतर अटक करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. कसून चौकशी केल्यानंतर चावला यांनी गुन्हा कबूल केला. चोरी करणं चुकीचं आहे, पण केवळ थरार अनुभवण्यासाठी चोरी केल्याचं चावला यांनी विमानतळ पोलिसांच्या चौकशीत सांगितलं. अटक झाली त्याच दिवशी चावला यांना 5 हजार डॉलरच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. केवळ मिसिसिपीमध्ये चावला यांच्या मालकिचे 17 हॉटेल असल्याची माहिती आहे.