जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्या पक्षाकडून निवडणूक लढविणारे भारतीय वंशाचे अशोक श्रीधरन यांना बॉनच्या महापौरपदासाठी निवडणूकपूर्व मतदानोत्तर चाचणीमध्ये सर्वाधिक पसंती असल्याचे समोर येत आहे.
या मतदानोत्तर चाचणीमध्ये श्रीधरन यांनी विरोधी पक्षांच्या दोघा उमेदवारांना मागे टाकले आहे. मात्र अद्याप या तिघांपैकी कोणत्या उमेदवाराला मत द्यायचे याबद्दलचा निर्णय जवळपास २६ टक्के म्हणजेच २.४५ लाख मतदारांनी घेतला नसल्याने खरा निकाल यानंतर लागणार आहे.
बॉन शहराच्या महापौरपदासाठी आज निवडणूक होत आहे. एक आठवडय़ापूर्वी ही मतदानोत्तर चाचणी घेण्यात आली होती. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. २००९च्या निवडणुकीपेक्षा या वेळी जास्त मतदान झाल्यास त्याचा फायदा श्रीधरन यांना होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांनी सांगितले.
श्रीधरन निवडून आल्यास ते जर्मनीतील प्रमुख शहरांतील पहिले भारतीय वंशाचे महापौर ठरणार आहेत. ते मर्केल यांच्या ख्रिश्चन डेमोक्रेटिक युनियन या पक्षातर्फे निवडणूक लढवत आहेत.