रुपयाचा विक्रमी तळातील प्रवास दिवसागणिक सुरूच असून डॉलरच्या तुलनेत रुपयाची बुधवारी ऐतिहासिक घसरण झाली. रुपयाने अमेरिकी डॉलरमागे बुधवारी सकाळी ७३.३४ असा नवीन ऐतिहासिक तळ दाखवला.

अमेरिकी डॉलरपुढे रुपयाचे विनिमय मूल्य निरंतर नवीन नीचांक गाठताना दिसत आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात रुपया ३४ पैशांच्या घसरणीने प्रति डॉलर ७३.३४ असा विक्रमी तळ रुपयाने दाखवला.

खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती प्रति पिंप ८५ डॉलर पर्यंत पोहोचल्या आहेत. प्रमुख आशियाई चलनांच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वेगाने घसरत असून देशाची ८० टक्के इंधन गरज आयातीद्वारे भागविणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी रुपयाची घसरण चिंतेचा विषय ठरत आहे. इंधन महागल्याने यामुळे महागाई वाढण्याची दाट शक्यता आहे.