एका महिलेला मारहाण केल्याच्या आरोपाखाली भारतीय संघाचा फिरकीपटू अमित मिश्रा याला मंगळवारी बंगळुरू पोलिसांनी अटक केली आणि नंतर काही वेळातच त्याची जामीनावर सुटका देखील करण्यात आली.
अमित मिश्रा विरोधात एका महिलेने बंगळुरू पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. गेल्या महिन्यात भारतीय संघाचे सराव शिबीर बंगळुरूत सुरू असताना अमित मिश्रा आणि या महिलेत बाचाबाची झाली. महिलेच्या आरोपानुसार, अमित मिश्राला भेटण्यासाठी त्याच्या खोलीत गेले असताना त्याने गैरवर्तन केले.  त्यानंतर झालेल्या भांडणाचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. त्यानंतर मिश्राची तक्रार नोंदविण्यासाठी महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेत भारतीय दंड संहितेच्या ३५४ कलमानुसार मिश्रावर गुन्हा दाखल केला होता. तसेच अमित मिश्राला एका आठवडय़ाच्या आत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मिश्रानेही पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज अमित मिश्र बंगळुरू पोलिसांसमोर हजर झाला. तब्बल तीन तास चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. कसोटी संघासाठी अमित मिश्राची निवड झाली होती. मात्र या प्रकरणामुळे त्याच्या खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.