पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पाककडून जम्मू-काश्मीरधील फुटिरतावादी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पाकच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या दुतावासामध्ये साजऱ्या होणाऱ्या या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त नवी दिल्लीत २३ मार्च रोजी संध्याकाळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमाला भारताचा एकही प्रतिनिधी न पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी दिली.
Raveesh Kumar, MEA: This time Pakistan High Commission decided to invite Hurriyat representatives on Pakistan National Day. On that basis, we have decided that we will not send any representative for their reception on Pakistan National Day this year. pic.twitter.com/RXHgGyqdaB
— ANI (@ANI) March 22, 2019
रविशकुमार म्हणाले, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांदरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे. मात्र, तरीही पाकिस्तानने काश्मीर खोऱ्यातील फुटिरतावादी आणि हुर्रियत नेत्यांना निमंत्रण दिले आहे. याचा भारताने तीव्र विरोध केला असून त्यासाठी भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला आपला प्रतिनिधी हजेरी लावणार नाही.
काश्मीर खोऱ्यातील फुटिरतावादी नेत्यांनी नेहमीच पाकिस्तानची बाजू घेतली आहे. तसेच इथल्या जनतेला धर्माच्या आणि स्वातंत्र्याच्या नावाने भारताविरोधात भडकावण्याचे काम करीत असतात. भारतातील दहशतवादी कारवायांसाठी या फुटिरतावाद्यांकडून पैसाही पुरवण्यात येतो. त्यामुळे अशा लोकांना पाकिस्तानकडून देण्यात आलेल्या निमंत्रणाचा भारताने विरोध केला आहे.