रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेणाऱ्या भारताला अमेरिकेने सूचक इशारा दिला आहे. रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा विकत घेण्याच्या निर्णयाचा भारत-अमेरिका संरक्षण संबंधांवर परिणाम होऊ शकतो असे ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्याने म्हटले आहे. एस-४०० ही रशियाने विकसित केलेली लांब पल्ल्याची जमिनीवरुन हवेत मार करणारी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा आहे.

रशियाकडून ही क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करणारा चीन पहिला देश आहे. २०१४ साली चीनने रशिया बरोबर एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदीचा करार केला. मागच्यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात भारताने रशियाबरोबर पाच अब्ज डॉलरचा एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदीचा करार केला.

एस-४०० संबंधी भारत-रशियामध्ये झालेला करार महत्वपूर्ण आहे असे ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्याने सांगितले. हा फार मोठा करार नाही या मताशी त्यांनी असहमती दर्शवली. अमेरिकेकडून भारत लष्करी साहित्याची खरेदी करतोय म्हणून रशियाकडून एस-४०० खरेदी करण्याच्या निर्णयाचा परिणाम होणार नाही हे मत मान्य नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एस-४०० करार महत्वपूर्ण ठरतो. भविष्यात उच्च तंत्रज्ञान सहकार्यात यामुळे अडचण निर्माण होऊ शकते असे संकेत अमेरिकन अधिकाऱ्याने दिले. या करारामुळे सीएएटीएसए कायद्यातंर्गत भारताला निर्बंधांचा सामना करावा लागू शकतो. रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करण्याविरोधात अमेरिकेन काँग्रेसने हा कायदा बनवला आहे. अमेरिकेच्या सीएएटीएसए कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या देशांवर, संस्था आणि व्यक्तींवर निर्बंध घालण्याच्या आदेशावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे.

काय आहे एस-४००
एस-४०० ही जगातील अत्याधुनिक मिसाइल सिस्टिम असून शत्रूची मिसाइल, फायटर विमाने अचूकतेने टिपण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. एस-४०० मिसाइल सिस्टिमचा भारताच्या शस्त्रास्त्र ताफ्यात समावेश झाला तर चीन, पाकिस्तानचे हवाई हल्ले विफल करता येतील.