घरातील मोलकरणीचा व्हिसा मिळवून घेताना चुकीची माहिती दिल्याबद्दल तसेच या मोलकरणीला अत्यल्प वेतन दिल्याच्या आरोपावरून भारताच्या न्यूयॉर्कमधील उपमहावाणिज्यदूत देवयानी खोब्रागडे यांना गुरुवारी अटक करण्यात आली. खोब्रागडे यांना जामिनावर सोडण्यात आले असले तरी दूतावासाच्या अधिकाऱ्याला अशा प्रकारे अटक करण्यात आल्याबद्दल भारताने अमेरिकेकडे नाराजी व्यक्त केली आहे.
आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी तसेच घरातील कामे करण्यासाठी देवयानी खोब्रागडे यांनी भारतातून संगीता रिचर्ड हिला अमेरिकेत नेले होते. त्या वेळी त्यांनी सादर केलेल्या व्हिसा अर्जात दिलेल्या तपशिलाप्रमाणे संगीता हिला वेतन न दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजता त्या मुलीला शाळेत सोडायला गेल्या असताना अटक करण्यात आली. न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्ह्य़ातील अधिवक्ता प्रीत भरारा यांनी  खोब्रागडे यांच्यावर मोलकरणीच्या व्हिसा अर्जात खोटी माहिती लिहिल्याचा आरोप ठेवला आहे.
खोब्रागडे यांना मॅनहटन मध्यवर्ती न्यायालयाचे दंडाधिकारी न्या. देब्रा फ्रीमन यांच्यासमोर हजर करण्यात आले. तेथे त्यांच्यावर व्हिसा फसवणूक आणि खोटी माहिती पुरवणे याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले. दोषी ठरल्यास त्यांना कमाल दहा वर्षे व किमान पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आहे. खोब्रागडे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळल्यानंतर त्यांची अडीच लाख डॉलर इतक्या जामिनावर मुक्तता करण्यात आली. मात्र त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला असून त्यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

‘आदर्श’ मधील फ्लॅटमुळे वादग्रस्त
वादग्रस्त अधिकारी म्हणून कारकीर्द गाजविलेल्या निवृत्त ज्येष्ठ आयएएस अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्याप्रमाणेच त्यांची मुलगी डॉ. देवयानी खोब्रागडे याही गेल्या काही वर्षांत वादात आणि चर्चेत आहेत. खोब्रागडे कुटुंबियांची ‘आदर्श’ इमारतीतीत फ्लॅटखरेदी अशीच संशयाच्या भोवऱ्यात आहे. आदर्शमध्ये उत्तम खोब्रागडे आणि डॉ. देवयानी खोब्रागडे या दोघांच्याही नावे फ्लॅट खरेदी करण्यात आले आहेत. डॉ. देवयानी यांनी ‘मीरा’ या ओशिवरा येथील सोसायटीत ५ जुलै २००४ रोजी फ्लॅट घेतला होता. या सोसायटीसाठी म्हाडाने जमीन दिली होती. त्यांचे वडील उत्तम खोब्रागडे हे त्याकाळात म्हाडाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. तरीही डॉ. देवयानी यांनी २९ जुलै २००४ रोजी आदर्श सोसायटीचे सदस्यत्व घेण्यासाठी अर्ज करताना आपले मुंबईत घर नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते. या कालावधीत त्या जर्मनीत होत्या आणि आदर्शचे सदस्यत्व आपण घेतले नसून ते आपल्या वतीने वडिलांनी घेतल्याचा दावा त्यांनी आदर्श प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगापुढे केला आहे. तर उत्तम खोब्रागडे यांनी तिच्या फ्लॅटबाबतची आपली जबाबदारी झटकली आहे. ओशिवरा येथील फ्लॅट देवयानी यांनी २००८ मध्ये एक कोटी ९० लाख रुपयांना विकला आहे.एकंदरीतच खोब्रागडे कुटुंबियांचे ‘आदर्श’ मधील फ्लॅट वादग्रस्त ठरले. केईएम रुग्णालयाशी संलग्न जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस झालेल्या डॉ. देवयानी यांनी १९९९ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत प्रवेश केला. जर्मनी, इटली व पाकिस्तान या देशांमध्ये त्यांनी काम केले. आता त्यांना व्हिसा कागदपत्रांमध्ये खोटी माहिती दिल्याच्या कारणावरून अटक झाली असल्याने त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

Liquor license, lok sabha election 2024, wife of sandipan Bhumre, mahayuti, chhatrapati sambhaji nagar
भूमरेंच्या पत्नीच्या नावेही मद्य परवाना
gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा

अटक वंशभेदातूनच -उत्तम खोब्रागडे
न्यूयॉर्कमध्ये भारताच्या उपमहावाणिज्यदूत देवयानी खोब्रागडे यांना झालेली अटक वंशभेदातून झाल्याचा आरोप देवयानी यांचे पिता आणि सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी केला असून अमेरिकेतील पोलीस यंत्रणेने या बाबत माफी मागावी, अशी मागणी केली आहे. आपल्या कन्येचा छळ करण्यासाठी आणि भारत सरकारच्या लौकिकाला बट्टा लावण्यासाठीच हा कट रचल्याचे देवयानीच्या अटकेवरून सिद्ध होते. भारतीयांना छळण्यासाठी वंशभेदाचा वापर करण्यात आला, हे स्पष्ट झाले आहे, असे उत्तम खोब्रागडे यांनी म्हटले आहे.

भारताकडून नाराजी
अटकेबद्दल भारताने नाराजी व्यक्त केली आहे. राजनैतिक अधिकाऱ्यास अशी अटक होणे अयोग्य असल्याचे राजनीतिज्ञांनी म्हटले आहे.भारताला या घटनेमुळे धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे; तर परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांनी  अमेरिकेच्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांना बोलावून आपली
नाराजी मांडली.