देशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कांचन चौधरी भट्टाचार्य यांचे मुंबईत सोमवारी निधन झाले. उत्तराखंड पोलीस दलाने त्यांच्या निधनाबाबत समाजमाध्यमावर संदेश पाठवून दु:ख व्यक्त केले आहे. भट्टाचार्य यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उत्तराखंड आयपीएस पोलीस संघटनेने त्यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त करताना म्हटले आहे की, भट्टाचार्य यांची अमूल्य सेवा सर्वाच्या स्मरणात राहील.

मुंबई येथील रूग्णालयात त्यांचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. त्यांच्या पश्चात पती व दोन मुली आहेत. चौधरी या १९७३ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी  होत्या. त्यांचा जन्म हिमाचल प्रदेशात झाला. २००४ ते २००७ या काळात त्या उत्तराखंड पोलिस दलात महासंचालक पदावर होत्या.  ३३ वर्षांच्या सेवेत त्यांनी बॅडमिंटनपटू सईद मोदी  मृत्यू प्रकरण, रिलायन्स -बॉम्बे डाइंग प्रकरण यात तपास केला होता. त्याआधी त्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातही काम केले. १९९७ मध्ये त्यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक मिळाले. उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना राजीव गांधी पुरस्कारही मिळाला होता. वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भट्टाचार्य यांनी देशातील  पहिल्या पोलीस महासंचालक होण्याचा मान २००४ मध्ये पटकावला होता. त्यावेळी त्या उत्तराखंड पोलीस दलाच्या प्रमुख होत्या. किरण बेदी यांच्यानंतर देशातील त्या दुसऱ्या महिला आयपीएस अधिकारी होत्या. भट्टाचार्य या नारायणदत्त तिवारी मुख्यमंत्री असताना पोलीस महासंचालक झाल्या व २००७ मध्ये त्या निवृत्त झाल्या होत्या. त्यांनी हरिद्वार येथून आम आदमी पक्षाच्या तिकिटावर २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांची लहान बहीण कविता चौधरी यांनी १९८० च्या सुमारास उडान मालिकेत भूमिका केली होती.कांचन यांनीही त्यात पाहुण्या कलाकार म्हणून काम केले.  ही मालिका कांचन चौधरी  यांच्या जीवनावर आधारित होती.