भारताची मंगळ मोहीम येत्या नोव्हेंबरमध्ये प्रस्तावित असून त्यामुळे जागतिक पातळीवर भारताचा आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये भागीदार बनण्याचा अधिकार वाढणार आहे. वैज्ञानिक उद्दिष्टे व क्षमता गाठल्याचे मंगळ मोहिमेतून अधिक स्पष्ट होणार असून त्याचा हा परिणाम असेल, असे मत ज्येष्ठ अंतराळ वैज्ञानिक के. कस्तुरीरंगन यांनी व्यक्त केले.
नियोजन आयोगाचे सदस्य असलेल्या कस्तुरीरंगन यांनी सांगितले की, आपल्या देशाच्या ग्रहीय संशोधन कार्यक्रमाचे मंगळ मोहीम हे विस्तारित रूप असणार आहे.
अतिशय किफायतशीर खर्चात मंगळाकडे यान पाठवण्यामुळे आपली अंतराळ क्षेत्रातील क्षमता सिद्ध होणार असून यानाची किंमत ही ४५० कोटी रूपये असणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
जेव्हा आपण किफायतशीर खर्चात हे करून दाखवू तेव्हा आंतरराष्ट्रीय मोहिमांत भागीदार होण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होणार आहे. जेव्हा भविष्यात समानव मंगळ मोहीम राबवली जाईल त्या वेळी भारत हा त्या मोहिमेत जागतिक समुदायाचा एक भाग असेल, कारण भारताने त्या वेळी आपले स्थान सिद्ध केलेले असेल.
वैज्ञानिक प्रयोग, तांत्रिक कौशल्ये व आंतरराष्ट्रीय मोहिमांसाठी भागीदार बनण्याकरिता पात्रता सिद्ध करणे अशी अनेक उद्दिष्टे या मोहिमेत आहेत.
अंतराळ स्पर्धेत चीनने भारताला मागे टाकल्याच्या मुद्दय़ावर ते म्हणाले की, दोन्ही देशात अंतराळ स्पर्धा नाही. चीनशी आमची स्पर्धा नाही, आपले अग्रक्रम वेगळे आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने दर्जेदार काम केले आहे. अतिशय कमी खर्चात आपण मोहिमा यशस्वी केल्या आहेत. देशाच्या गरजांनुसार आपला अंतराळ कार्यक्रम राबवला आहे. आपल्याकडे जागतिक दर्जाचे दूरसंवेदन व दळणवळण उपग्रह आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताची मंगळ मोहीम
इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या मते भारताची मंगळाकडे यान पाठवण्याची मोहीम ही २०१५-१६ मध्ये पूर्ण होईल. ‘मार्स ऑरबायटर’ हे यान श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून भारताच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (पीएसएलव्ही-एक्सएल) च्या मदतीने पाठवले जाईल. ते मंगळाभोवतीच्या ५०० बाय ८००० कि.मी कक्षेत प्रस्थापित केले जाईल. त्यावर २५ किलोचे पेलोड असतील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias international missions involvement depends on success of mars mission
First published on: 22-01-2013 at 06:02 IST