राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या बुधवारी (१ मे रोजी ) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पहिल्यांदाच अयोध्या दोऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. तसेच त्या सरयू नदीलाही भेट देणार आहेत. याबरोबरच हनुमानगढी मंदिरात दर्शन आणि आरतीही करणार आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात राष्ट्रपती भवनाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरामध्ये रामल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. रामल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अयोध्येमध्ये भक्त दर्शनासाठी गर्दी करत आहेत. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या अयोध्येत येणार असल्यामुळे प्रशासनानेही मोठी तयारी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा असला तरी भाविकांना रोजच्या प्रमाणे रामलल्लाचे दर्शन करता येणार आहे, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : मुस्लिमांचं काय घेऊन बसलात? मला ५ मुलं आहेत! मल्लिकार्जुन खरगेंचं मोदींना प्रत्युत्तर

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या १ मे रोजी सायंकाळी चार पर्यंत अयोध्येमध्ये पोहोचणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. त्यानंतर त्या रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित राहण्याची शक्यता आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यामुळे लखनौ-अयोध्या-गोरखपूर हा राष्ट्रीय महामार्ग आणि अयोध्या विमानतळ ते रामपथ जोडणाऱ्या मार्गावरी वाहतूक वळवण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.