माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करणारे सतवंत सिंग आणि केहार सिंग या दोन मारेकऱ्यांचा ‘मृत्यूदिन’ साजरा करत शीख धर्मातील सर्वोच्च तख्त समजल्या जाणाऱ्या अकाल तख्तने त्यांचा सन्मान केल्यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
या दोघांना ६ जानेवारी १९८९ रोजी फाशी देण्यात आली होती. त्या दिवसाच्या स्मृत्यर्थ अकाल तख्तने रविवारी सतवंत सिंग याचे वडील त्रिलोक सिंग यांना ‘सिरोपा’ (सन्मानवस्त्र) दिला. यावेळी जथेदार गैनी गुरबचन सिंग यांनी सतवंत व केहार यांना ‘धर्मासाठी शहीद झालेले वीर’ असा किताब दिला. ‘अकाल तख्त आणि दरबार साहिब यांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांवर सूड उगवण्यासाठी या दोघांनी बलिदान दिले. त्यामुळे आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली,’ असे दल खालसाचे नेते कंवरपाल सिंग यांनी सांगितले.