सीमेपलीकडून दहशतवादाला खतपाणी घातले जात असल्याच्या आरोपाला अमेरिकेकडून पाठबळ मिळाल्याच्या पाश्र्वभूमीवर रविवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात येथे चर्चा होणार आहे. पाकिस्तानातून भारतीय भूमीत दहशतवादाचा हैदोस घालणाऱ्या शक्तींचा बीमोड करण्याबाबतचा प्रश्न पंतप्रधान या वेळी उपस्थित करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पाकिस्तानात कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांविरुद्ध पाकिस्तान सरकार कोणती कारवाई करते त्यावर दोन्ही देशांमधील चर्चेचे भवितव्य अवलंबून असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. वॉशिंग्टनहून न्यूयॉर्कला आगमन झाल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रथमच शरीफ यांची भेट घेतली.
भारतासमवेत संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तान इच्छुक असून त्यासाठी आपण डॉ. सिंग यांची भेट होण्याच्या प्रतीक्षेत आहोत. या भेटीमुळे दोन्ही देशांमध्ये नवा अध्याय सुरू होईल आणि पूरक व उद्देशपूर्ण चर्चेत भारतासमवेत सहभागी होण्याची आमची इच्छा आहे, असेही शरीफ म्हणाले.