घराशेजारी असलेल्या मशिदीच्या भोंग्याचा त्रास होतो अशी तक्रार करणाऱ्या महिलेला ईश्वर निंदा केल्या प्रकरणी १८ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इंडोनेशिया या ठिकाणी राहणारी ही महिला चिनी बौद्ध धर्मीय आहे अशी माहिती समोर आली आहे. हा निर्णय आल्यावर या महिलेला कोर्टातच रडू फुटले. मिलीयाना असे या महिलेचे नाव आहे. कोर्टाने निर्णय दिल्यावर तिला बेड्या घालून कोर्टाबाहेर आणले गेले. ‘रॉयटर्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

ईश्वर निंदा करून या महिलेने देशाच्या कायद्याचे उल्लंघन केले आहे असे कोर्टाने म्हटले आहे. जुलै २०१६ मध्ये मिलीयानने घराशेजारी असलेल्या मशिदीच्या भोंग्यातून जो आवाज येतो त्याचा आपल्याला त्रास होतो अशी तक्रार केली होती. दिवसातून ५ वेळा हा आवाज येतो ज्यामुळे ध्वनीप्रदूषण होते असेही या मिलीयानाने तिच्या तक्रारीत म्हटले होते.

इंडोनेशियात जगातील सर्वाधिक मुस्लिम बांधव वास्तव्य करतात, त्याचप्रमाणे बौद्ध धर्मीयांची संख्याही जास्तच आहे. ख्रिश्चन आणि इतर धर्मीय लोकही या ठिकाणी राहतात. या देशाच्या घटनेने प्रत्येक धर्माला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे या महिलेने ईश्वर निंदा केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या वर्षी जकार्ता येथील चिनी राज्यपालांनाही ईश्वर निंदा केल्या प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यातत आली होती. आता या महिलेला झालेल्या शिक्षेविरोधात आम्ही वरच्या कोर्टात अर्ज करू असे या महिलेच्या वकिलाने म्हटले आहे.