महेश सरलष्कर

करोनाच्या मध्यात आरोग्य मंत्रालय देऊन मोदींनी मनसुख मंडावियांकडे ‘संकटमोचका’ची भूमिका देऊ केली. ही जबाबदारी मंडावियांनी अत्यंत खुबीने निभावल्यामुळे त्यांच्याकडे गुजरातचे भावी मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचा उल्लेख होऊ लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विश्वासू मंत्र्यांपैकी एक केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया. करोनाकाळात मोदींनंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेले मंत्रीही मंडावियाच. ते पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून गुजरातमधील पोरबंदरमधून विजयी झाले तर त्यांच्या राजकीय शिरपेचात आणखी एक तुरा रोवला जाऊ शकेल. 

हेही वाचा >>> अरुणाचलवरून चीनची पुन्हा कुरापत; भारताने दावा फेटाळल्यानंतरही भूमिकेत बदल नाही

राजकारणात अलगदपणे यशाची एक-एक पायरी चढत जाण्याची किमया फार कमी जणांना अवगत असते, मंडावियांनी गेल्या आठ वर्षांमध्ये दाखवलेली आहे. करोनाच्या हाताळणीवरून केंद्र सरकारवर टीकेचा भडिमार होत असताना मोदींनी पेशाने डॉक्टर असलेल्या हर्षवर्धन यांच्याकडून आरोग्यमंत्रीपद काढून घेतले आणि मंडावियांकडे जोखमीची जबाबदारी सोपवली. करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेपासून प्राणवायू सिलिंडरच्या पुरवठयापर्यंत अनेक वादग्रस्त विषय मंडावियांना हाताळावे लागले होते. केंद्रीय रसायने व खताचे मंत्रीपद सदानंद गौडा यांच्याकडून काढून घेऊन या मंत्रालयाचा स्वतंत्र कारभारही मंडावियांकडे सोपवला गेला. 

करोनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीत हाहाकार माजला होता. तेव्हा सरकारी रुग्णालयांमध्ये गुपचूप भेटी देऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी मंडाविया करत असत.  त्यांना सायकलवरून फिरण्याची फार हौस. संसदेतही ते सायकलवरून येत असत. सामान्य रुग्णाप्रमाणे रांगेत उभे राहात असत. सायकलवरून फिरण्याच्या या सवयीमुळे त्यांना ‘हरित खासदार’ म्हणतात.  गुजरातमधील मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या मंडावियांचे वागणे केंद्रीय मंत्री झाल्यावरही मध्यमवर्गीय आहे. २०१२ मध्ये ते राज्यसभेचे खासदार बनले. मंडाविया भावनगरच्या पालिटाणा तालुक्यातील. तिथूनच त्यांनी २००२ मध्ये विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत यश मिळवले. गुजरात विधानसभेतील ते सर्वात तरुण आमदार ठरले. महाविद्यालयीन काळापासून मंडाविया अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रिय होते. ‘अभाविप’चे ते गुजरात कार्यकारणी सदस्य होते. २०१३ मध्ये प्रदेश भाजपमध्ये सचिवपद देण्यात आले. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी त्यांना गुजरात अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनचे अध्यक्ष केले. त्यानंतर मंडाविया मोदी निष्ठावान मानले जाऊ लागले. मोदींनी त्यांना २०१६ मध्ये रस्ते-वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विकास, बंदरविकास, जहाजबांधणी, रसायने-खते, जलसंपदा अशा महत्त्वाच्या मंत्रालयामध्ये राज्यमंत्री केले.