एपी, पॅरिस
फ्रान्समध्ये पंतप्रधान फ्राँस्वा बायरो यांच्या सरकारचा विश्वासदर्शक ठरावात पराभव झाला असून, अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ यांच्यासमोर बारा महिन्यांत चौथा पंतप्रधान निवडण्याची नामुष्की ओढवली आहे.
पंतप्रधान बायरो यांचा विश्वासदर्शक ठरावात ३६४-१९४ असा मोठ्या फरकाने पराभव करण्यात आला. फ्रान्सवरील कर्जे कमी करण्यासाठी सरकारी खर्च कमी करण्याच्या बायरो यांच्या मताला खासदार साथ देतील, हा विश्वास बायरो यांना महागात पडला. विश्वासदर्शक ठरावात बायरो यांचा पराभव झाल्यामुळे त्यांना माक्राँ यांच्याकडे राजीनामा देणे बंधनकारक राहणार आहे. ते नऊ महिने पदावर होते. अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने, युक्रेन, गाझामध्ये सुरू असणाऱ्या युद्धांचे आव्हान अशामध्ये फ्रान्सला पुन्हा अंतर्गत राजकीय अस्थिरतेचा सामना करावा लागत आहे.
बायरो यांनी ऑगस्ट महिन्यात विश्वासदर्शक ठराव घेण्याची घोषणा केली होती. त्यांनी केलेल्या आर्थिक नियोजनावर हा ठराव घेण्यात आला. बायरो यांच्यानंतर अन्य नेता पंतप्रधान पदासाठी सध्या तरी समोर नसल्याचे चित्र आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये गॅब्रएिल अटल हे पंतप्रधान पदावरून पायउतार झाले. त्यानंतर ‘ब्रेक्झिट’मध्ये चर्चेची भूमिका बजावणारे मायकेल बार्नियर यांना डिसेंबर महिन्यात हटविण्यात आले. आता बायरो यांचा विश्वासदर्शक ठरावात पराभव झाला. माक्राँ यांच्यासमोर आता पंतप्रधान निवडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
जून २०२४मध्ये माक्राँ यांनी नॅशनल असेंब्ली विसर्जित केली. नंतर निवडणुका घेण्यात आल्या. त्यात आपल्या बाजूने लोक कौल देतील, अशी अपेक्षा माक्राँ यांना होती, पण तसे घडले नाही.
फ्रान्समधील कर्जसंकटावर उपाय सुचविण्यासाठी खासदारांचे सहाय्य घेणे भाग आहे. हे संकट शांत, न दिसणारे आणि सहन न होणाऱ्या दुखापतीसारखे आहे. काहीही बदल न करता तसेच सुरू ठेवणे धोकादायक ठरेल. – फ्राँस्वा बायरो (पंतप्रधान म्हणून केलेल्या शेवटच्या भाषणात)