छत्तीसगढमधील बस्तर जिल्ह्यातील जीरम घाटीमध्ये कॉंग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर झालेला हल्ला टाळता आला असता, अशी माहिती आता पुढे आली आहे. नक्षलवादी जीरम घाटीमध्ये मोठा घातपाती हल्ला करणार असल्याची शक्यता वर्तविणारे एक, दोन नव्हे; तब्बल २४ अलर्टस गुप्तचर विभागाचे अतिरिक्त महासंचालक मुकेश गुप्ता यांना पाठवले होते, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, हे अलर्टस छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त भागातील पोलिसांपर्यंत पोहोचलेच नाही. त्यामुळेच नक्षलवादी आपला निशाणा साधण्यात यशस्वी झाले आणि कॉंग्रेसच्या राज्यातील नेतृत्त्वाला आणि कार्यकर्त्यांना आपला जीव गमवावा लागला.
गुप्तचर विभागाकडील माहिती पोलिसांकडे देण्याचे काम करणाऱया सुरक्षायंत्रणेतील बहुसंस्थात्मक केंद्रापर्यंतदेखील ही माहिती पाठविण्यात आली नाही. ‘इंडियन एक्स्प्रेस’कडे या अलर्टसच्या प्रती आहेत. हे अलर्टस पोलिस महासंचालक, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक, नक्षल विभागाचे अतिरिक महासंचालक आणि बस्तरचे पोलिस महासंचालक यांना पाठविण्यात आले होते. सीआरपीएफ आणि बस्तरच्या पोलिस महासंचालकांनी आपल्याला असे कोणतेही अलर्ट मिळालेले नसल्याचे म्हटले आहे.
नक्षलग्रस्त विभागाचे अतिरिक्त महासंचालक आर. के. वीज यांनी आपल्याला हे अलर्टस मिळाल्याचे कबुल केले. ते म्हणाले, नक्षलग्रस्त भागात कोणतीही कारवाई करायची जबाबदारी तेथील पोलिस अधीक्षक आणि पोलिस महासंचालकांवर असते. आम्ही केवळ त्यांना आवश्यक तेवढे मनुष्यबळ पुरवतो. त्याचबरोबर कोणतीही कारवाई करताना काही समन्वय साधण्याची गरज असेल किंवा अतिरिक्त मनुष्यबळ हवे असेल, त्याचवेळी आम्ही कार्यवाही करतो.