बंदी घालण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझर आणि त्याचा भाऊ अब्दुल रौफ यांच्याविरुद्ध इंटरपोलने मंगळवारी रेड कॉर्नर नोटीस जारी केली. पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

अझर आणि रौफ यांच्याविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) अजामीनपात्र वॉरण्ट मिळाल्यानंतर इंटरपोलने नव्या रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. पठाणकोट तळावर हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी अजामीनपात्र वॉरण्ट जारी करण्यात आले आहे.

सदर दोघांविरुद्ध यापूर्वी जारी करण्यात आलेल्या अटक वॉरण्टवर पाकिस्तानने अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने नव्याने जारी करण्यात आलेली रेड कॉर्नर नोटीस ही केवळ औपचारिकता असल्याचे बोलले जात आहे.

संसद आणि जम्मू-काश्मीर विधानसभेवरील हल्ल्यात सहभाग असल्याबद्दल इंटरपोलने यापूर्वी जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस अद्याप प्रलंबित आहे. या दोघांसमवेतच एनआयएने काशीफ जान आणि शाहीद लतिफ यांच्याविरुद्धही रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती केली आहे, जे दहशतवादी भारतात घुसले त्यांचे जान आणि लतिफ हे हॅण्डलर होते.