गेल्या काही दिवसांमध्ये देशामध्ये असहिष्णुतेचा जो वाद उभा राहिला आहे, तो अकारण निर्माण करण्यात आला आहे. भरपूर पैसे मिळालेल्या काही कल्पक डोक्याच्या व्यक्तींनी या वादाची निर्मिती केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांनी केला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वादाला राजकीय बळ देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. प्रादेशिक प्रवासी भारतीय दिवसानिमित्त सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
भारतीय प्रसारमाध्यमांच्या कार्यपद्धतीविषयी मला काहीच बोलायचे नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्यावेळीही अचानकपणे चर्चवरील हल्ल्यांच्या वृत्तांकनाद्वारे भारतातील ख्रिस्ती समाज एकटा पडल्याची वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. एखाद्या चोरीच्या घटनेलाही चर्चवरील हल्ल्याचे रूप दिले जात असे. या सगळ्यामागे मतांचे राजकारण होते. प्रसारमाध्यमांकडूनही या सगळ्याचे वृत्तांकन करण्यात येत होते. या सगळ्यासाठी कुणाला पैसे देण्यात आले होते किंवा नाही, हे मला माहित नाही. मात्र, असहिष्णुतेचा वादही बिहार निवडणुकांच्या तोंडावर निर्माण करण्यात आला आणि आता निवडणुका या सगळ्या गोष्टी आपोआप थांबल्या आहेत. मी तुम्हाला फक्त सत्य सांगत आहे. मात्र, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, असे यावेळी व्ही.के. सिंह यांनी म्हटले.