जम्मू आणि काश्मीरमधील पिपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) या राजकीय पक्षाचे माजी मंत्री सईद अल्ताफ बुखारी यांनी पीडीपीतून बाहेर पडत नव्या पक्षाची घोषणा केली आहे. ‘अपनी पार्टी’ असे या नव्या पक्षाचे नाव असून त्याचा अजेंडाही जाहीर करण्यात आला. यामध्ये काश्मिरी पंडितांना पुन्हा सन्मानाने खोऱ्यात बोलवण्याबाबत भुमिका मांडण्यात आली आहे.

नव्या पक्षाचा अजेंडा सांगताना बुखारी म्हणाले, “राज्यातील जनतेचा स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची जपवणूक करणे हा ‘अपनी पार्टी’चा मूळ हेतू असेल. यामध्ये अनेक वर्षांपूर्वी काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना पुन्हा सन्मानाने खोऱ्यात बोलवण्याचाही समावेश आहे. तसेच महिला आणि तरुणांचे सक्षमीकरण हा देखील यातील महत्वाचा अजेंडा आहे.”

“आम्ही स्वप्नं आणि कल्पना विकण्यासाठी इथं आलेलो नाही. तर, आमचा दृष्टीकोन हा नेहमी व्यावहारिक, प्रामाणिक आणि न्याय्य असेल. यासाठी आम्ही एक राजकीय व्यासपीठ तयार करण्याचा संकल्प केला असून यामध्ये लोक राजकीय प्रक्रियेचे वास्तविक भागीदार असतील,” असे बुखारी यांनी पक्षाच्या उद्घाटनाप्रसंगी म्हटले.

बुखारी यांच्या अपनी पार्टीमध्ये डेमोक्रेटिक पार्टी नॅशनलिस्ट पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री गुलाम हसन मिर, पीडीपीचे माजी आमदार दिलावर मिर, नूर मोहम्मद शेख, अश्रफ मिर आणि काँग्रेसचे माजी आमदार फारुक अंद्राबी, इरफान नकीब आदींनी प्रवेश केला आहे.