Apple India vs US Manufacturing: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच ॲपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांना भारतात आयफोन उत्पादन प्रकल्प न उभारण्याचे आवाहन केले होते. यानंतर जर टिम कुक यांनी ॲपल कंपनीचा उत्पादन प्रकल्प भारतातून अमेरिकेत हलवण्याचा निर्णय घेतला तर याचा भारतापेक्षा जास्त आर्थिक फटका ॲपलला बसेल, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हचे संस्थापक अजय श्रीवास्तव यांच्या अहवालात म्हटले आहे.

या अहवालात असे म्हटले आहे की, जर आयफोनचा उत्पादन प्रकल्प भारतातून अमेरिकेत हलवल्यास, भारतातील काही कमी पगाराच्या नोकऱ्या कमी होतील, पण यामुळे भारत नवीन युगातील तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करू शकेल आणि स्मार्ट फोनच्या उथळ असेंब्ली लाईन्सपासून दूर जाऊ शकेल.

“जर ॲपलचा असेंब्ली प्रकल्प भारतातून बाहेर पडला तर भारताला उथळ असेंब्ली लाईन्सची उभारणी थांबवावी लागेल आणि त्याऐवजी चिप्स, डिस्प्ले, बॅटरी आणि त्यापलीकडे सखोल उत्पादनात गुंतवणूक करता येईल”, असेही श्रीवास्तव यांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे.

देशांतर्गत उद्योगांना नुकसान

अहवालात पुढे असे म्हटले आहे की, “आपण व्यवस्थित पाहिले तर, भारत प्रति आयफोन ३० डॉलर्स कमावतो, त्यातील बराचसा भाग उत्पादन लिंक्ड सबसिडी योजनेअंतर्गत सबसिडी म्हणून ॲपलला परत दिला जातो. तसेच, ॲपलसारख्या मोठ्या कंपन्यांच्या विनंतीवरून भारत स्मार्टफोनच्या प्रमुख घटकांवरील शुल्क कमी करत आहे, ज्यामुळे स्थानिक उत्पादन परिसंस्था तयार करणाऱ्या देशांतर्गत उद्योगांना नुकसान होत आहे.”

अमेरिकेत रोजगार निर्मिती

भारत आणि चीन या दोन्ही देशांना उत्पादक म्हणून प्रत्येक आयफोनमागे फक्त ३० डॉलर्स मिळतात, जे आयफोनच्या किमतीच्या ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. परंतु उत्पादन प्रकल्पातून कमी उत्पन्न मिळत असले तरी, यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती होते. चीनमध्ये सुमारे ३ लाख आणि भारतात ६० हजार कामगार या उत्पादन प्रकल्पांमध्ये काम करतात. याच कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना अ‍ॅपलने त्यांचे उत्पादन प्रकल्प अमेरिकेत हलवावे असे वाटत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्मचाऱ्यांना द्यावा लागणार जास्त पगार

भारतातून ॲपलचे उत्पादन प्रकल्प हलवल्यास अमेरिकेत सुरुवातीच्या स्तरावरील नोकऱ्या निर्माण होतील, परंतु ॲपलसाठी उत्पादन खर्च अनेक पटीने वाढेल. भारतात ॲपल उत्पादन प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांना दरमहा सरासरी २९० अमेरिकन डॉलर्स इतका पगार मिळतो. पण प्रकल्प अमेरिकेत हलवल्यास, अमेरिकेच्या किमान वेतन कायद्यांनुसार तेथे कामगारांना २९०० डॉलर्स पगार द्यावा लागेल. आयफोन डिव्हाइस असेंब्लीचा खर्च ३० डॉलर्सवरून ३९० डॉलर्सपर्यंत वाढेल. एकूणच, ॲपलने आयफोनची किंमत वाढवली नाही तर प्रति डिव्हाइस नफा ४५० डॉलर्सवरून ६० पर्यंत कमी होईल.