गेल्या हंगामातील खराब कामगिरीनंतर चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत उत्तम कामगिरी नोंदवली आहे. धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघाने पहिला सामना गमावल्यानंतर चेन्नईने सलग 3 सामने जिंकले आहेत. फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, रवींद्र जडेजा यांना संघाच्या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय देण्यात आले. या कामगिरीनंतर चेन्नईच्या ड्रेसिंग रूममधील वातावरणही आनंदी आहे. दरम्यान, याच ड्रेसिंग रूममधील जडेजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
चेन्नईचा चिन्नाथाला म्हणजेच सुरेश रैनाने हा व्हिडिओ शेअर केला असून यात जडेजा दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रमी स्मिथच्या फलंदाजीची नक्कल करत आहे. या व्हिडिओत रैनाही हसत आहे. चेन्नईच्या अनेक फॅन क्लबनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. शेवटच्या सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सला 18 धावांनी पराभूत केले. फाफ डु प्लेसीस चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्यांनी ९५ धावांची जबरदस्त खेळी साकारली. या सामन्यानंतरचा रैनाने हा व्हिडिओ काढला आहे.
View this post on Instagram
रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना हे चेन्नईचे महत्त्वाचे खेळाडू आहेत. सलग तीन विजयांसह चेन्नईने गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. कोलकाताविरुद्ध धोनीनेही आपल्या फलंदाजीची झलक दाखवली, त्यामुळे आगामी सामन्यात तो स्फोटत फलंदाजी करणार, का याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. चेन्नई सुपर किंग्जचा पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. बंगळुरूचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.