वरिष्ठ आयपीएस अधिकारी अनिलकुमार सिन्हा यांची केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे. लोकपाल कायद्याच्या पद्धतीने सीबीआय संचालकांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रणजित सिन्हा बऱ्याच वादानंतर निवृत्त झाल्यानंतर नवीन सीबीआय संचालकांची नेमणूक करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने रणजित सिन्हा यांना टू जी घोटाळ्याच्या चौकशीतून बाहेर होण्यास सांगितले होते.
अनिलकुमार सिन्हा हे १९७९ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असून त्यांनी टू जी घोटाळा व कोळसा खाण वाटप घोटाळा या दोन वादग्रस्त प्रकरणांच्या पाश्र्वभूमीवर सूत्रे हाती घेतली आहेत. सिन्हा हे ५८ वर्षांंचे असून त्यांचा सीबीआयमधील विशेष संचालक म्हणून २१ महिन्यांचा अनुभव आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याच्या चौकशीची देखरेख त्यांनी केली होती. सीबीआयची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करणे हे त्यांच्यापुढचे मोठे आव्हान आहे. बिहारमधून आलेले ते सीबीआयचे तिसरे संचालक आहेत. यापूर्वीचे संचालक रणजित सिन्हा व ए.पी.सिंग हे बिहारचेच होते. आताचे संचालक अनिलकुमार सिन्हा हे हार्वर्ड विद्यापीठाच्या केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे विद्यार्थी असून अतिशय मृदुभाषी आहेत. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, कोणतेही आव्हान छोटे किंवा मोठे नसते तर आव्हाने ही चांगली संधी असते. अतिशय नम्रतेने आपण हे पद स्वीकारत असून सीबीआयपुढची आव्हाने आपल्याला माहीत आहेत. न्याय व मूल्यनिष्ठा यांना आपण महत्त्व देऊ असे ते म्हणाले.