वॉशिंग्टन : लष्करी अधिकारी मेजर जनरल कासिम सुलेमानी यांना हवाई हल्ल्यात ठार करणाऱ्या अमेरिकेवर इराणने बुधवारी पहाटे प्रतिहल्ला केला. इराकमधील अमेरिका आणि मित्रराष्ट्रांच्या तळांवर इराणने डझनभराहून अधिक क्षेपणास्त्रे डागली. मात्र, त्यातील जीवितहानी स्पष्ट होऊ शकली नाही.

इराणने इराकमधील अमेरिकी फौजांच्या २२ ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. मात्र, त्यात इराकचे कुणीही मारले गेलेले नाही, असे इराक लष्कराने स्पष्ट केले. इराणी माध्यमांनी मात्र या हल्ल्यात अमेरिकेचे ८० सैनिक ठार केल्याचा दावा केला. सध्या इराकमधील तळांवर अमेरिकेचे एकूण पाच हजार सैनिक तैनात आहेत.

अमेरिकेला लगावलेली ही थप्पड आहे, अशी प्रतिक्रिया इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनी यांनी व्यक्त केली. तर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र सर्व काही ठीक आहे, असा दावा केला.

हवाई सेवेवर परिणाम

इराणचा प्रतिहल्ला आणि युक्रेनच्या विमान दुर्घटनेचा हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. इराणची हवाई हद्द टाळण्यासाठी मार्गबदल करण्यात येणार असल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले. यामुळे विमान प्रवासाच्या वेळेत वाढ होणार आहे. भारतातून अमेरिका आणि युरोपला जाणाऱ्या विमानांना किमान ४० मिनिटांचा विलंब होणार आहे

इराणला कधीच अण्वस्त्रे बाळगू देणार नाही : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणला अण्वस्त्रे बाळगण्याची कधीही मुभा दिली जाणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सांगितले. इराण दहशतवादाला खतपाणी घालेपर्यंत तरी मध्यपूर्वेत शांतता नांदू शकत नाही, असे ते म्हणाले. इराणने अमेरिकी तळांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये अमेरिका किंवा इराकचा कुणीही ठार झाला नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले. तुमचे भवितव्य चांगले असावे, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी शांततेचा स्वीकार करण्यास अमेरिका तयार आहे, असे ट्रम्प यांनी इराणला उद्देशून सांगितले.