Iran Missile Attack o Israel : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासांपूर्वी इस्रायल व इराण यांच्यात शस्त्रविराम झाल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर आता हे युद्ध थांबलंय असं सर्वांना वाटत होतं. “मी दोन्ही देशांशी चर्चा केली आणि दोन्ही देशांनी यासाठी सहमती दर्शवली आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. मात्र, इराणने ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे. आधी वक्तव्य आणि नंतर थेट कृतीतून इराणने ट्रम्प यांना खोटं ठरवलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटलं आहे की “इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रविराम अथवा असा कोणताही करार झालेला नाही”. पाठोपाठ इराणने इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्र डागून त्यांचा मनसुबा स्पष्ट केला आहे.

इराणने इस्रायलवर केलेल्या ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांनी उभय देशांमध्ये शस्त्रविराम झाल्याची घोषणा केल्यानंतर काहीच तासांत इराणने इस्रायलवर हल्ला केला आहे. इस्रायच्या संरक्षण दलाने (इस्रायल डिफेन्स फोर्सने) म्हटलं आहे की मागील काही तासांत इराणने तीन वेळा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. इस्रायली माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार बीरशेबा येथील एका रहिवासी इमारतील क्षेपणास्र पडून झालेल्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत.

ट्रम्प यांच्या दाव्यांवर इस्रायलची प्रतिक्रिया नाही

इस्रायली माध्यमांनी इराणी हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. तीन जण जखमी असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं असल्याचं वृत्त इस्रायली माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. मात्र, रुग्णालयातून तिघांच्याही मृत्यूची पुष्टी करण्यात आली .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही वेळापूर्वी इस्रायलने त्यांच्यावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. तसेच हा हल्ला रोखण्यासाठी संरक्षण दल पुढे सरसावलं असल्याचं टेलिग्राम अलर्टद्वारे सांगण्यात आलं होतं. दरम्यान, ट्रम्प यांच्या शस्त्रविरामाच्या दाव्यांवर इस्रायलने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. उलट इराणी लष्कराच्या हल्ल्यांबाबत इस्रायल डिफेन्स फोर्सकडून सातत्याने माहिती दिली जात आहे. इस्रायल सरकारने शश्त्रविरामाला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र पंतप्रधान नेतान्याहू यांच्या कार्यालयाने यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही.