पुढच्या काही दिवसात इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष आणखी चिघळू शकतो. इराणने त्यांच्या अण्वस्त्र विकास कार्यक्रमासंबंधी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. इराणने घेतलेल्या या निर्णयामुळे जगाची चिंता वाढणार आहे. सध्या जगभरातून आखातात निर्माण झालेला तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेने शुक्रवारी पहाटे केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये इराणचे टॉप लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला. त्यामुळे खवळलेल्या इराणने अणवस्त्र कार्यक्रमासंबंधी हे पाऊल उचलले आहे. २०१५ साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पुढाकारने हा अण्वस्त्र करार झाला होता.

विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून माघार घेतली आणि या संघर्षाला सुरुवात झाली. सुलेमानी यांच्या हत्येने हा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. इराणने थेट अमेरिकेला धमकी दिली आहे. ‘सुलेमानी यांच्या रक्ताने ज्यांचे हात माखले आहेत, त्यांना सोडणार नाही’ असा इशारा इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला आहे.

इराणने काय निर्णय घेतला?
२०१५ मध्ये झालेल्या अण्वस्त्र करारानुसार इंधनाच्या समृद्धीकरणावर निर्बंध होते. त्या निर्बंधांचे पालन न करण्याची भूमिका इराणने घेतली आहे. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर कुठल्याही मर्यादा नाहीत ही हसन रौहानी प्रशासनाची भूमिका इराणच्या सरकारी वाहिनीवरुन जाहीर करण्यात आली.

काय होता हा करार?
इराणने अण्वस्त्र विकसित करु नयेत, यासाठी २०१५ साली संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेबरोबर हा करार करण्यात आला होता. सुरक्षा परिषदेमध्ये ब्रिटन, फ्रान्स, चीन, रशिया आणि फ्रान्स हे पाच कायमस्वरुपी सदस्य आहेत. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेने या करारातून एकतर्फी माघार घेतली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय धमकी दिली?
अमेरिकी नागरिक आणि अमेरिकेच्या स्थळांवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही. हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही. जर इराणने आमच्या ठिकाणांवर हल्ला केला तर इराणमधील ५२ ठिकाणे आमच्या निशाण्यावर असतील. इराणने पुन्हा हल्ला करु नये असा माझा त्यांना सल्ला असेल. पण त्यांनी पुन्हा हल्ला केल्यास त्यांच्यावर कधीही झाला नसेल इतका शक्तीशाली हल्ला केला जाईल, अमेरिकेला नुकसान पोहोचवल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल”. अशी थेट धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iran steps back from nuclear deal dmp
First published on: 06-01-2020 at 12:10 IST